धामारीजवळ एक मोर मृतावस्थेत तर दुसऱयाला जीवदान

धामारी, ता. 25 नोव्हेंबर 2015 (सुभाष शेटे)- राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असलेल्या शिरूर तालुक्‍यातील डफळापूर जवळून वाहणा-या ओढ्याच्या कडेला झाडीत ग्रामस्थांना एक मोर मृतावस्थेत आढळला तर दुसरा जखमी अवस्थेत निदर्शनास आला.

स्थानिक ग्रामस्थांनी आमच्या कवठे येमाई येथील प्रतिनिधींशी तातडीने संपर्क साधून या बाबत त्यांना माहिती देताच त्यांनी लगेचच या बाबत वनविभागाशी संपर्क साधला. या परिसरात अवकाळी पाऊस पडत असल्याने वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी डफळापूर येथे दाखल झाले. मृत मोराची पाहणी व पंचनामा तसेच मृत व जखमी असलेल्या मोराला पुढील कार्यवाहीसाठी ते घेऊन गेले. या परिसरात मोरांची मोठी संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी शासनाने तातडीने विविध उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याची गरज स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

याबाबत प्रत्यक्ष घटना स्थळावरुन मिळालेल्या माहिती नुसार, सोमवारी (ता. 23) सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरू होता. डफळापूर जवळून वाहणा-या ओढ्या शेजारून घरी निघालेले येथील ग्रामस्थ सोमनाथ पवार व इतर शेतक-यांना झाडीत एक मोर मृतावस्थेत तर बाजूलाच एक मोर तडफडत असलेला दिसला. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो न झाल्याने ग्रामस्थांनी आमचे कवठे येमाई येथील प्रतिनिधी सुभाष शेटे यांना या बाबत माहिती दिली. शेटे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना त्वरेने या बाबत कल्पना दिली. रात्री पाऊस सुरू असल्याने एक जिवंत असलेला मोर ग्रामस्थांनी घरी नेऊन रात्रभर त्याची देखभाल करून सकाळी पुढील उपचारासाठी जिवंत वनविभागाच्या ताब्यात दिला.

शिरूरचे वनपाल सपकाळ, वनरक्षक क्षीरसागर व उकिरडे, फरगडे,शिंगाडे या वनकर्मचा-यांनी येऊन मृत असलेल्या मोराची पाहणी व पंचनामा केला. अडीच वर्षे वयाचा मोर सुमारे 6 ते 7 दिवसांपूर्वीच मृत झाला असण्याची शक्‍यता वनपाल सपकाळ यांनी व्यक्त केली. दुस-या जखमी अवस्थेतील मोठ्या मोरास स्थानिक ग्रामस्थ श्रीधर उकिरडे, महेश डफळ, सोमनाथ पवार, दत्ताजी डफळ इत्यादींनी गावात आणून रात्रभर त्याची देखभाल केली. जखमी मोरास पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. पण या परिसरात दुष्काळी परिस्थितीत ही मोरांना जिवापाड जीव लावणा-या ग्रामस्थांनी एका मोराचा संशयास्पद मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली आहे.

दरम्यान, या परिसरात असणा-या सुमारे 300 मोरांसाठी शासनाने त्यांना पिण्याचे पाणी, मोरांना खाद्य व धान्य,व त्यांना उंच झाडांवर बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिंचेच्या झाडांची रोपे तातडीने लावण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

प्राणीमित्राचा उपक्रम कौतुकास्पद
धामारी डफळापूर हा दुष्काळी भाग असून ही येथील प्राणीमित्र शेतकरी अंकुश व वामन महादू शिंदे हे गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या वस्तीत येणा-या असंख्य मोरांना स्वतः धान्य व पाणी देवून शेकडो मोरांचे संगोपन करण्याचे कार्य करीत आहेत. परिसरात फिरणारी भटकी कुत्रे, शिकारी यांच्यावर जागृत राहून सातत्याने लक्ष ठेवत मोरांना इजा होणार नाही याची दक्षता घेत परिसरात असणा-या मोरांचे संगोपन करण्याचे कार्य विना मदत करीत आहेत. शिंदे बंधूंच्या मळ्यात त्यांच्या कुटुंबीयांकडून अनेक वर्षांपासून वस्तीत येणा-या मोरांना जपण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. त्यांचा हा उपक्रम निश्‍चितच कौतुकास्पद आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या