ज्येष्ठ तमाशा कलावंत शासनाच्या पुरस्कारापासून वंचितच

कवठे यमाई, ता. 26 नोव्हेंबर 2015 (सुभाष शेटे)- तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत श्री. गंगारामबुवा कवठेकर हे शासनाच्या कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पुरस्कारापासून वंचितच आहेत.

गेली 50 ते 60 वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्रातील तमाशा क्षेत्रात एक नामवंत फड मालक, प्रसिद्ध ढोलकीपटू व विनोदाचा बादशहा असलेल्या सोंगाड्याची तमाशात यशस्वी भूमिका साकारत तमाम महाराष्ट्रातील तमाशा रसिकांची मने जिंकत वाहवा मिळविणारे शिरूर तालुक्‍यातील कवठे येमाई गावचे व वयाच्या 86 व्या वर्षात पदार्पण करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत श्री गंगाराम बुवा कवठेकर. महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा मानाचा तमाशा सम्राज्ञी कै.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पुरस्कार मिळावा म्हणून आज ही या पुरस्कारापासून उपेक्षित आहेत. सर्व कागदपत्रांसह शासन दरबारी 6 महिन्यांपूर्वीच प्रस्ताव सादर करून ही या पुरस्कारापासून अद्याप ही ते या पुरस्काराच्या प्रतीक्षेत आहेत. हा पुरस्कार त्यांना देण्याची घोषणा भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथ मुंडे यांनी तळेगाव ढमढेरे येथे 17 फेब्रुवारी 2003 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात केली होती. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या तमाशा क्षेत्रातील बहुमोल कामगिरीची दखल घेत त्यांना हा महत्त्वाचा पुरस्कार तातडीने देण्याची मागणी परिसरातील जुने जाणते तमाशा रसिक व ग्रामस्थांमधून होत आहे.

वयाच्या 86 व्या वर्षात असणारे कवठे येमाई येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत श्री गंगारामबुवा कवठेकर यांनी गेली 50 ते 60 वर्षे उभ्या महाराष्ट्रात तमाशाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करतानाच तमाशा कला जिवंत ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे. याच बरोबर तमाशा कलावंतांना वेळोवेळी उभारी देण्याचे व त्यांच्या विविध प्रश्‍नी प्रामाणिकपणे लक्ष घालत ते सोडविण्याकामी अविरत प्रयत्न ही त्यांनी सातत्याने केले आहेत. त्यांच्या तमाशा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल विविध संस्था,व्यक्तींनी घेत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. पण शासनाचा मानाचा कै. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पुरस्कार मिळण्यापासून ते अद्याप ही वंचित आहेत. हा पुरस्कार मिळावा म्हणून शासन दरबारी त्यांनी 6 महिन्यांपूर्वीच त्यांनी दाखल केलेल्या प्रस्तावात शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान जुन्नर तालुका अध्यक्ष काशिनाथ आल्हाट, तमाशा सम्राज्ञी कै.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचे चिरंजीव विजय नारायणगावकर यांनी ही शिफारस केलेली आहे.

कवठेकर यांच्या विचार करता महाराष्ट्र शासनाने त्यांना हा पुरस्कार तातडीने देण्याची मागणी तमाशा रसिकांमधून होत आहे. तमाशा क्षेत्रात कार्यरत असतानाच गंगारामबुवा कवठेकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात ही सक्रिय सहभाग घेतलेला आहे. शिरूर तालुका तमाशा कलावंत संघटनेचे अध्यक्षपद भूषविताना कलावंताचे विविध प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले आहे. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या साक्षरता अभियानात त्यांनी सक्रिय सहभाग घेत साक्षरता विषयी जनजागृती करण्याचे काम केले. अनेकदा पुणे आकाशवाणी केंद्रावर त्यांचे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक वगनाट्याचे कार्यक्रम झाले. हुंडा बंदी विरोधात आकाशवाणीवर सादर केलेले सोय-याला धडा शिकवा हे नभोनाट्य त्या काळी खूपच गाजले व प्रभावशाली ठरले. तमाशा क्षेत्रातून तमाशा कलेचा वारसा व संस्कृती जपत तमाम महाराष्ट्रातील तमाशा रसिकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत कवठेकर यांनी तमाशा क्षेत्रात कार्यरत असतानाच महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, व्यसनमुक्ती अभियान, शौचालय ही काळाची गरज, हगणदारीमुक्त गाव, शेतकरी हिताच्या शासनाच्या विविध योजनांचा प्रसार वगनाट्यातुन सादर करीत प्रभावी प्रबोधन करण्याचे कार्य केले. असे हे बहुरंगी व ज्येष्ठ तमाशा कलावंत असणारे ढोलकी सम्राट कवठेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या कला व सांस्कृतिक मंत्रालयाने तातडीने मानाचा तमाशा सम्राज्ञी कै.विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर पुरस्कार जाहीर करण्याची मागणी ग्रामस्थ व त्यांच्या तमाशा रसिक चाहत्यांमधून होत आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या