संकेतस्थळाच्या वृत्तानंतर बनावट 'लकी ड्रॉ'चा भांडाफोड

मांडवगण फराटा, ता. 26 डिसेंबर 2015 (संपत कारकूड / तेजस फडके/ सतीश केदारी)- शिरूर तालुक्यातील www.shirurtaluka.com या संकेतस्थळाने बनावट 'लकी ड्रॉ'चा भांडाफोड केल्यानंतर चिडलेल्या ग्राहकांनी अखेर काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील शाखेमध्ये जावून कार्यालयातील संगणक, खुर्चांसह कंपनीचे नाव असलेल्या साईनबोर्डाची तोडफोड केली.

'साईगोली मार्केटिंग सोल्युशन लिमिटेडने भव्य विक्रीवाढ योजने'च्या गोंडस नावाखाली सुरु केलेल्या लकी ड्रॉ अखेर बनावट निघाला आहे. www.shirurtaluka.comच्या पत्रकारांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते. संकेतस्थळाने सर्वप्रथम याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. संकेतस्थळावरील बातम्या विविध व्हॉट्सऍप ग्रुप व सोशल नेटवर्किंगवरून फिरत होत्या. संकेतस्थळाने फसवणूक होण्यापासून नागरिकांना सावध केल्यामुळे शिरूरसह श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक संकेतस्थळाचे आभार मानत आहेत.

साईगोली शॉपींग व्हाऊचरद्वारे वर्षभरात 5600 रुपये किंमतीच्या गृहपयोगी वस्तूची खरेदी करता येईल, असे आमिष दाखवले होते. दहा हप्त्यांद्वारे नागरिकांकडून गोळा केलेले कोटयावधी रुपयांची माया गोळा करुन कंपनीने गुपचूप शेवटची सोडत काढून नागरिकांना काही न देता ड्रॉ सोडत गुंडाळली. शिरुर तालुक्यातून अंदाजे 700 ग्राहकांची फसणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काष्टी येथील एका प्रथितयश मंगलकार्यालयात ही सोडत काढून ग्राहकांची दिशाभूल करुन सोडत काढल्याचा आव आणला. परंतु, एकाही ग्राहकाला बक्षिस न लागल्यामुळे नागरिकांच्या अखेर लक्षात आले. नागरिकांना जागृत करण्यासाठी पाहिली बातमी प्रसिध्द करण्यामध्ये www.shirurtaluka.comचा मोठा वाटा आहे. भेट योजनेच्या आड मोठा धोका असल्याची शक्यता प्रथम वर्तविली गेली होती. फक्त एजंटलाच बक्षिसांची खैरात करण्यात आल्याचे निर्देशनास आले आहे. कोणताही पुरावा मागे न सोडता गोळा केलेले हप्ते, न बोलविताच घेतलेली सोडत, तक्रार करुनही सेवेअंतर्गत येणाऱया सर्व पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकांनी घेतलेली भुमिकांमुळे ग्राहकांना शेवटपर्यंत लुटण्यास साईगोली यशस्वी झाली. याची सर्व जबाबदारी पोलिस स्टेशनवर येत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कारवाई करणाऱया सर्वांचे तोंड पैशांद्वारे बंद केल्यामुळेच ही योजना पुर्ण करण्यात संचालकांना यश आले, असा आरोप असंख्य नागरिकांमधून होत आहे.

फौजदारी कारवाईची मागणी
साईगोली नावाने भेट योजना सुरु करुन नागरिकांना लाखोला गंडविलेल्या कंपनीविरोधात पोलिस प्रशासन अजुनही सुस्त असून हा सर्व प्रकारच गंभीर आहे. या योजनेची तत्काळ चौकशी करुन फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अद्यापर्यंततरी कोणतीही कारवाई केली नाही. गरज भासल्यास कंपनीविरोधात ग्राहक हक्क न्यायालयात दाद मागणार असल्याचे आरटीआय कार्यकर्ते औंदुबर फटाले यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या