शिक्रापूर पोलिसांनी ज्येष्ठांना लुटणारी टोळी पकडली

शिक्रापूर, ता. 11 फेब्रुवारी 2016- नकली सोन्याची बिस्किटे देऊन ज्येष्ठ महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबविणारी आंतरराज्यीय टोळी शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडी येथून पकडली आहे. ही टोळी एका जागरूक नागरिकाच्या फोनमुळे शिक्रापूर पोलिसांच्या हाताला लागली.

शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 9) रात्री अकराच्या सुमारास पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांना सणसवाडी येथून एका नागिरकाने फोन केला होता. एका इंडिका (एमएच 24 एएफ 0475) गाडीत चौघे जण महामार्गावर शिकार करण्याबाबत चर्चा करीत असल्याचे सागितले. कंकाळ यांनी रात्रगस्तीचे पथक तत्काळ सणसवाडीला पाठवून संबंधित गाडी व त्यातील चौघांना ताब्यात घेतले. परमेश्वर ऊर्फ चमू राजेंद्र गायकवाड (वय 21), सुभाष विष्णू मरे (वय 27), पांडूरंग तुकाराम जाधव (वय 22, सर्व रा. लोनुती, ता. जि. लातूर) व उत्तम वामणराव मिरवले (वय 35, रा. चेरा, ता. जळकोट, जि. लातूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर दरोड्याच्या तयारीत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

चौकशीदरम्यान गाडीत नकली सोन्याची तीन बिस्किटे, चाकू, लाकडी दांडके, मिरचीपूड, नायलॉन दोरी आदी साहित्य आढळले. त्यांनी गुन्हे केल्याची कबुली  दिली आहे. त्यांना शिरूर न्यायालयात बुधवारी हजर केले. पुढील तपास फौजदार चेतन थोरबोले करीत आहेत.

शिक्रापूर हद्दीसह जिल्ह्यातील गुन्ह्यांची माहितीही घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, अशा पद्धतीने फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी (8308444100) केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या