प्रसंगी होमगार्ड सियाचीन भागात जाऊन देशाचे रक्षण करेल !

शिरूर, ता.२३ फेब्रुवारी २०१६ (मुकुंद ढोबळे) :  समाज व पोलीस खात्याने होमगार्ड यांच्या हातात हात घालून काम केले व त्यांना सन्मान दिला तर राज्य देश यांच्या रक्षणासाठी होमगार्ड कारगिल, सियाचीन भागात जाऊन देशाचे रक्षण करेल असा आत्मविश्वास होमगार्ड चे जिल्हा समादेशक प्रा. दिपक जांभळे यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका होमगार्ड कार्यालयाचे नुकतेच प्रशासकीय इमारतीत स्थलांतर व नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ होमगार्डचे जिल्हा समादेशक प्रा. दिपक जांभळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी शिरूर तालुका महिला दक्षता अध्यक्षा शोभना पाचंगे, माजी तालुका होमगार्ड समादेशक बबनराव कर्डिले,माहेर संस्थांचे सुनिल खळदकर, प्रशासन अधिकारी सुभाष धापटे, श्री. घाड्गे, प्रा. संतोष देंडगे, शिरूरचे समादेशक अनंता मोरे, समादेशक बी. एस. पवार, जयकूमार रासकर, अजय न्हालवे, अब्बास सय्यद, भोरचे गोरड, अंबिका लोखंडे, चंदाताई चव्हाण, पोतकूळे व मोठया प्रमाणात नागरिक तसेच  होमगार्ड जवान उपस्थित होते.

यावेळी बोलताना  होमगार्डचे जिल्हा समादेशक प्रा. दिपक जांभळे म्हणाले, 'देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पासून ते अनेक मोठया नेत्यांनी होमगार्ड मध्ये काम केले असल्याने त्याचा आम्हाला अभिमान अाहे. केवळ समाजसेवा म्हणून समाजाचे संरक्षण करण्याचे काम होमगार्ड करीत असतो. रात्रंदिवस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करूनही होम गार्डला सापत्न वागणूक दिली जाते,  याची खंत आहे. होमगार्डला चांगले प्रशिक्षण, चांगल्या प्रकारची हत्यारे दिल्यास आणिबाणीच्या प्रसंगी प्रत्येक गावागावांत नागरिकांचे संरक्षण होमगार्ड करतील.'

माळीण गावच्या दु्र्घटनेत एक मुलगा जिवंत सापडला त्यांचे श्रेय फक्त होमगार्ड्चे आहे. परंतु, श्रेय घेणारे दूसरेच असतात त्याकडे आम्ही लक्ष देत नाही. केवळ समाजसेवेचे व्रत घेतले आहे ते पूर्ण करतो,  असेही त्यांनी सांगितले.

होमगार्डचे तालुका समुदेश अनंता मोरे म्हणाले, 'गेली अनेक दिवसांपासून तालुका होमगार्ड करिता कार्यालय हवे होते. परंतु, अनेक प्रयत्न करूनही अपयश येत होते. अखेर शासनाने नवीन प्रशासकीय इमारतीत सुसज्ज कार्यालय दिले. यामुळे होमगार्डला स्वतःचा निवारा मिळाला असल्याचा आनंद झाला आहे.'

शिरूर तालुका दक्षता कमिटीच्या अध्यक्षा शोभना पाचंगे म्हणाल्या, 'होमगार्ड हे एक सामाजिक काम असले तरी शासनाने या विभागाकरिता चांगले मानधन देण्याची तरतूद केली तर याकडे तरुण, महिला यांचा ओढा वाढण्यास मदत होईल.'
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या