'शासन आपल्या दारी' उपक्रम ठरला केवळ देखावा !

वडगाव रासाई, ता. २९ फेब्रुवारी २०१६ (संपत कारकूड / सतीश केदारी ) : येथे शनिवारी झालेल्या शासन आपल्या दारी उपक्रमाला अालेल्या नागरिकांची कामे न झाल्याने अनेकांना रिकाम्या हातांनीच माघारी परतावे लागले अाहे. यामुळे हा उपक्रम केवळ देखावा ठरल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होती.
 
शिरुर तालुक्यात आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे वडगाव रासाई येथे प्रथमच आयोजन केले होते. वडगाव रासाई जिल्हा परिषद गटातील एकूण १४ गावांमधील सर्व नागरिकांना सरकारी कामे करुन घेण्यासाठीचे अावाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेक गावांत फ्लेक्स लावण्यात अाले होते. परंतु, प्रत्यक्षपणे या उपक्रमाला नागरिकांनी अत्यंत अल्प प्रतिसाद दिला अाहे. लोकसंख्येच्या तुलनेत अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसत होते. यावेळी महसुल खात्यातील तक्रारी मोठ्या प्रमाणावर दिसत होत्या.तर  पुरवठा शाखेमध्ये नागरिकांनी असंख्य गा-हाणी मांडली. यामध्ये रेशनिंग कार्डसंबंधी खराब झालेल्याची संख्या भरपूर होती. ते बदलुन घेण्यासाठी तसेच नवीन नाव दाखल करणे, रेशनिंग विभाजणासाठीचे अर्ज दाखल करण्यासाठी थोडेबहुत नागरिक उपस्थित होते. प्रत्यक्षपणे काही कामे ही किचकट असल्यामुळे काम न होताच नागरिक फक्त माहिती घेवून बाहेर पडताना दिसत होती. त्यामुळे नागरिक असमाधानी दिसून येत होते. तालुक्याला असंख्य चकरा माराव्या लागतात म्हणून ‘शासनच आपल्या दारी’ ही योजना अत्यंत चांगली असली तरी, प्रत्यक्ष मात्र नागरिकांना याचा मोठया प्रमाणात लाभ होताना दिसून आला नाही.

एकाच दिवसांमध्ये सर्व शासकीय यंत्रणा उभी करुनही नागरिकांना मात्र काम न होताच हताश होत माघारी जाण्याचे अनेक प्रसंग यानिमित्त समोर आले असून यामध्ये आधार कार्डावाल्यांची संख्या जास्त होती. आधार कार्डचे एकच युनिट असल्यामुळे नागरिकांची दिवसभर झुंबड या केंद्रावर होती. असंख्य नागरिक रांगेमध्ये दिवसभर उभे राहूनही शेवटी काहींना माघारी जावे लागले. विजेच्या बचतीसाठी शासनाकडून कमी किंमतीमध्ये उपलब्ध करुन दिलेले एलईडी बल्बची मोठया प्रमाणावर खरेदी नागरिकांनी केली. यामध्ये सुमारे १२०० बल्बची विक्री झाली.शासनाकडून आता डिझिटिल यंत्रणेद्वारे सर्व योजनेचा लाभ प्रत्येक गावामध्येच देण्याची आवश्यकता असून, त्यादृष्टीने सरकार प्रयत्न करीत असल्याचे बाबुराव पाचर्णे यांनी भाषणामध्ये सांगितले.

नागरिकांनी आपले कामधंदे सोडून तसेच मोलमजुरी करणा-या असंख्य नागरिकांनी आपली रोजंदारी बुडवून आपले काम करण्यासाठी हजेरी लावली खरी परंतु यामधून नेमके गरजुंना याचा किती लाभ झाला हाच मोठा सवाल अाहे?
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या