सविंदणेत विहीरीत पडलेला बिबट्या झाला जेरबंद !

सविंदणे, ता. ६ मार्च २०१६ (सुभाष शेटे) : येथील  लंघे मळ्यात भक्षाच्या शोधात असलेला सुमारे २ वर्ष वयाचा बिबट्या शनिवारी रात्री येथील एका विहिरीत पडला. अाज (रविवार) वनविभागाच्या कर्मचा-यांच्या व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांतुन बिबट्याला सुरक्षित जेरबंद करण्यात यश अाले अाहे.

सविस्तर माहीती अशी की, येथील लंघे मळ्यातील शेतकरी दादाभाऊ म्हाळू लंघे यांची गट क्र. २३०८ मध्ये विहीर आहे. त्यांचा नातू ज्ञानेश्वर लंघे हा आज सकाळी साडे आठच्या दरम्यान विहिरीवरील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी  गेला असता त्याला विहिरीत गुरुगुरन्याचा आवाज आला. यावेळी त्याने विहिरीत डोकावले असता बिबट्या निदर्शनास आला. दरम्यान, संविदणे गावात प्रथमच बिबट्या विहिरीत पडला असल्याची बातमी वा-यासारखी परिसरातील गावांत पसरली. बिबट्याला पाहण्यासाठी हजारो माणसांनी लंघे मळयाकडे धाव घेतली. त्याने तातडीने गावाचे सरपंच बाबाजी पडवळ, बाळासाहेब लहू पडवळ यांना माहिती दिली. त्यांनी लगेचच वनविभाग व पोलिसांना या बाबत माहिती दिली. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख व त्यांची रेस्क्यू टीम तसेच शिरूर वनविभागाचे वनपाल सपकाळ व त्यांचे सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी अथक परिश्रम करीत विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला दुपारी १ च्या दरम्यान बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यानंतर बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारा केद्राकडे करण्यात आली. या वेळी विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

माणिक डोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख व त्यांची रेस्क्यू टीम लंघे मळ्यात दाखल होई पर्यंत बघ्यांनी एकच गर्दी केल्याने गर्दी नियंत्रित करताना पोलिस व वन कर्मचा-यांची मोठी दमछाक झाली. स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागास बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्याकामी मोठी मदत  केली. अखेर दुपारी १ च्या सुमारास विहिरीत सोडलेल्या पिंजा-यात बिबट्या स्वताःहून गेल्याने वन कर्मचा-यांनी लगेचच पिंज-याचा दरवाजा बंद करीत पिंजरा वर काढला व लगेचच एका गाडीत पिंजरा ठेवून बिबट्याला माणिकडोह बिबटा निवारा केंद्राकडे रवाना केले. यावेळी भक्षाच्या शोधात अंदाज न आल्याने हा बिबट्या विहिरीत पडला असावा, असे मत वनपाल सपकाळ यांनी व्यक्त केले.

संविदणे परिसरात प्रथमच बिबट्या आढळून आल्याने सामाजिक वनीकरण विभागाचे पडवळ यांनी बिबट्या व इतर वन्य प्राण्यांपासून रात्रीच्या वेळी शेतीस पाणी देताना सावधानता बाळगावी, असे अावाहन केले आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या