सर्पमित्र व डॉक्टरांच्या प्रसंगावधानाने बैलाचे वाचले प्राण

तळेगाव ढमढेरे, ता. ९ मार्च २०१६ (शेरखान शेख) : येथील वसुमळा या ठिकाणी असलेले शेतकरी भाऊसाहेब शंकर भुजबळ यांच्या शेतात मशागतीचे काम चालू असताना त्यांच्या राजा या बैलाला अचानक घोणस जातीच्या अतिविषारी सापाने चावा घेतला परंतु या ठिकाणचे सर्पमित्र व डॉक्टर यांच्या मदतीने या बैलाचे वाचविण्यास यश आले आहे.

तळेगाव ढमढेरे येथील वसूमळा या ठिकाणी भुजबळ यांच्या राजा या बैलाला शेतात काम चालू असताना घोणस जातीच्या अतिविषारी सापाने चावा घेतला.यावेळी साप चावलेले दंश दिसल्यामुळे भुजबळ यांचा मुलगा संतोष याने त्वरित येथील सर्पमित्र गणेश टिळेकर याचेशी संपर्क साधला. सर्पमित्र टिळेकर व शेरखान शेख यांनी त्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली असता त्या बैलाला घोणस चावला असल्याने तो बैल निपचित पडलेला होता.यावेळी त्यांनी त्वरित जनावरांचे डॉक्टर राजेंद्र त्र्यंबके, डॉ. सुर्यकांत भुजबळ, डॉ. श्रीधर शिंदे यांचेशी संपर्क साधत माहिती दिली यावेळी डॉ. त्र्यंबके यांनी या ठिकाणी धाव घेत सर्पदंश लस आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले. परंतु या वेळी दंश झालेल्या बैलास लवकरात लवकर लस देणे गरजेचे असल्याने सर्पमित्र टिळेकर यांनी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी वैजिनाथ काशिद व तळेगाव ढमढेरे ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर दिपक ढवळे यांचेशी संपर्क साधून झालेला सर्व प्रकार सांगत सर्पदंशा वरील लस देण्याची विनंती केली. यावेळी डॉ. काशिद व डॉ. ढवळे यांनी लगेचच हि लस देण्याची तयारी दर्शविली. यांनतर लस उपलब्ध होताच उपचार सुरु केले. यानंतर उपचार करताच काही वेळाने बैल हालचाल करू लागला. यानंतर तेथे असलेले भाऊसाहेब भुजबळ, संतोष भुजबळ, सत्यवान झगडे, सोमनाथ भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले.

बैल उपचारास चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टर त्र्यंबके यांनी सांगताच भुजबळ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर अनेक दिवस जनावरांची सेवा करत असताना प्रथमच सर्पदंश झालेल्या बैलाचे प्राण वाचविण्यास यश आले असल्याचे डॉक्टर त्र्यंबके यांनी सांगितले.

 आज पर्यंत अनेक साप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडत असताना अनेकांना चावा झाल्यानंतर त्यांचे प्राण वाचविण्यास मदत केली असून बैला सारख्या मुक्या प्राण्याचे प्राण वाचविण्यास आज मदत केली आहे त्या बैलाचे प्राण डॉ. काशिद व डॉ. ढवळे यांनी उपलब्ध करून दिलेल्या लस मुळे वाचू शकले आणि मुक्या प्राण्याचे प्राण वाचविण्याचे काम आमच्या हातून घडले  असल्याचे समाधान असल्याचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या