माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांचे निधन

शिरूर, ता. 19 मार्च 2016- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे (वय ७९) यांचे शनिवारी (ता. १९) पहाटे पुण्यामध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. थिटे हे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी होते.

शिरूर तालुक्यातील केंदूर गावचे असलेले थिटे यांनी इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात केली. शनिवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे मुळ गाव केंदूर (ता. शिरूर) गावात दुखवटा पाळत बंद पाळण्यात आला. यांच्या पार्थिवावर दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.

कायद्याची पदवी घेतलेल्या थिटे यांनी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, बारामतीचे खासदार आदी पदांसह राज्याचे गृहमंत्रिपदही भूषविले. थिटे यांनी बाणेर येथे श्री छत्रपती संभाजी शैक्षणिक संस्‍था, सातारा या नावाने व्यावसायिक प्रशिक्षण संस्था सुरू केली. सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, तसेच तालुक्यातील अनेक संस्थेत विविध पदांवर काम केले. शिरूरमध्ये रांजणगाव एमआयडीसीची मुहूर्तमेढ करून या एमआयडीसीचे ते प्रणेते झाले. राजकारणासोबतच बापूसाहेब थिटे सहकारी क्षेत्रातही कार्यरत होते.

शरद पवार व बापूसाहेब थिटे हे 1962 पासूनचे अत्यंत जवळचे सहकारी व महाविद्यालयापासूनचे मित्र होते. त्यांनी सुरवातीला पुणे शहर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रीय झाले. पुढे सन 1967 मध्ये जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून कार्यरत होताना शिरुर पंचायत समितीचे सभापती, पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, शिरुर तालुक्‍याचे 1984- 89 व सन 89 ते 94 अशा सलग दोनदा आमदार झाले. 1991 ते 1993 या काळात त्यांनी गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुढे बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार म्हणूनही त्यांनी आपला कार्यकाल गाजविला. सध्याच्या शिरुरच्या राजकारणातील बहुतेक सर्वच पदाधिकारी हे त्यांच्याच राजकीय संस्कारांमध्ये वाढलेले आहेत. शिरूरच्या सर्वांगीण उन्नतीसाठी घोडेगंगा सहकारी साखर कारखाना स्थापना करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. चासकमान व भीतेवाडी धरणाचे काम शरद पवार यांच्या सहकार्याने त्यांने मार्गी लावले. त्यांच्या मागे पत्नी विजयमाला, राजेंद्र व धनंजय हे मुलगे व वैशाली होळकर या मुलांचा समावेश आहे.

बापूसाहेबांच्या निधनाने धोरणी राजकारणी आणि विश्‍वासू सहकारी गमावला अशा शब्दात शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. पंचायत समितीपासून ते लोकसभेपर्यंत थिटे यांचा प्रवास आहे. सतत दुष्काळी म्हणून गणल्या गेलेल्या शिरूर मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. एक धोरणी राजकारणी व सहकारातून जनसेवा करणारा कार्यकर्ता गमावला असेही त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या