गोलेगावमध्ये वाळूच्या ट्रकने ज्येष्ठ नागरिकाला चिरडले

गोलेगाव, ता. 20 मार्च 2016- वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून जिजाबा सीताराम वाखारे (वय 64, रा. गोलेगाव, ता. शिरूर) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने पळून जाणाऱ्या ट्रकचा पाठलाग करून ट्रकचालकाला बेदम मारहाण करत ट्रक पेटवून दिला. शुक्रवारी (ता. 18) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

जिजाबा वाखारे यांचे पुत्र रामदास जिजाबा वाखारे यांनी या अपघातप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक शांताराम बाळू शेवाळे (रा. निमगाव भोगी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकचालक शांताराम शेवाळे हा शुक्रवारी रात्री वाळूने भरलेला ट्रक (एमएच 12 एचबी 5491) घेऊन गोलेगावहून शिरूरकडे भरधाव चालला होता. गोलेगाव जवळील वाखारे मळ्याजवळ जिजाबा वाखारे हे आपल्या शेतातील घरासमोरील अंगणात झोपले होते. यावेळी त्यांच्या डोक्‍यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर शेवाळे हा आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन पळून गेला. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका वाळूच्या ट्रकचालकाच्या हा प्रकार लक्षात आला व त्याने त्या ठिकाणी थांबून आसपासच्या नागरिकांना याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी जमा झालेल्या जमावातील तरुणांनी पळून गेलेल्या ट्रकचा पाठलाग केला व तर्डोबाची वाडीजवळ हा ट्रक अडवला. त्या वेळी चालक शेवाळे हा नशेत असल्याने तरुणांनी त्याला बेदम मारहाण करीत ट्रक पुन्हा गोलेगावमध्ये आणला. त्या वेळी संतप्त जमाव जमला. रात्री-अपरात्री होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे व चालकांच्या अरेरावीमुळे संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला. दरम्यान, शिरूर व रांजणगाव एमआयडीसीतून आग विझविण्यासाठी आगीचे बंब आणण्यात आले, मात्र तोपर्यंत वाळूचा ट्रक जळून खाक झाला होता.

दरम्यान, जिजाबा वाखारे यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेकांनी बेकायदा वाळूउपसा व बेकायदा वाळू वाहतुकीबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या