निमगावमध्ये विशेष मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र- पलांडे

निमगाव म्हाळुंगी, ता. 25 मार्च 2016- समाजातील विशेष मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी लघुउद्योग केंद्रामार्फत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी दिली.

महाबळेश्वर येथे रोटरी डिस्ट्रिक्‍ट 3131 व रोटरी इंटरनॅशनल यांच्या वतीने आयोजित केलेल्या रोटरी अध्यक्षांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण परिषदेत पलांडे बोलत होते. ते म्हणाले, 'निमगाव म्हाळुंगी येथे शिक्रापूर रोटरी क्‍लब, हडपसर रोटरी इंटरनॅशनल व निमगाव म्हाळुंगी येथील श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. समाजातील अंध, अपंग, कर्णबधिर, शारीरिक विकलांग अशा विशेष मुलांना 75 लघुउद्योगांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.'
 
या लघुउद्योग केंद्राला रोटरी इंटरनॅशनलकडून आर्थिक साह्य मिळणार असून, त्यासाठी टप्प्याटप्प्याने सुमारे 40 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विशेष मुलांची निवास व भोजनाची सुविधा; तसेच अद्ययावत सोयीसुविधांयुक्त वसतिगृह, व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध उद्योगांशी निगडित असलेली यंत्रसामग्री, सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, प्रशिक्षित प्राध्यापकवर्ग असणार आहेत. रोटरीतर्फे चालविला जाणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे वीरधवल करंजे व डॉ. मच्छिंद्र गायकवाड यांनी सांगितले.
 
या वेळी शिक्रापूर रोटरी क्‍लबचे नियोजित अध्यक्ष लधाराम पटेल व सचिव संजीव मांढरे उपस्थित होते.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या