शिंदोडीच्या सरपंचांचे पद तीन अपत्यांमुळे झाले रद्द

शिंदोडी, ता. 29 मार्च 2016- येथील सरपंच ललिता बाळू पवार यांना तीन अपत्यांच्या कारणामुळे पद गमवावे लागले आहे. त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर निर्णय देताना अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरविले आहे.

इंद्रभान सदाशिव ओव्हाळ यांनी 25 ऑगस्ट 2015 रोजी ललिता पवार यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ग्रामपंचायत सदस्या पवार यांना तीन अपत्य असून, तिसऱ्या अपत्याचा जन्म दहा सप्टेंबर 2010 रोजी झाल्याचे त्यांनी तक्रार अर्जात नमूद केले होते. शिवाय, या अर्जासोबत ओव्हाळ यांनी कागदोपत्री काही पुरावेही सादर केले होते.
 
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पवार यांना याबाबत नोटीस बजावून त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली होती. त्यादरम्यान त्या समाधानकारक खुलासा करू शकल्या नाहीत व बाजू मांडू शकल्या नाहीत. तक्रारदार ओव्हाळ यांच्या वतीने ऍड. शिवशंकर हिलाळ यांनी बाजू मांडली. त्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झाली. ओव्हाळ यांची तक्रार व त्यांनी सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रदीप पाटील यांनी पवार यांना तीन अपत्यांच्या मुद्द्यावर अपात्र ठरविले आहे.

सरपंच ललिता पवार म्हणाल्या, "मला तीन अपत्ये झाली होती; परंतु एका मुलीचा मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत मला दोनच अपत्ये आहेत. मला अपात्र ठरविण्याच्या निर्णयाविरोधात मी आयुक्तांकडे अपील दाखल करणार आहे.''
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या