शिरूरच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा लोळगे बिनविरोध

शिरूर, ता. 6 एप्रिल 2016- शिरूरच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा राजेंद्र लोळगे यांची बिनविरोध निवड निश्‍चित झाली आहे. या पदासाठी लोळगे यांचा एकमेव अर्ज मंगळवारी (ता. 5) दाखल झाला. मंगळवारी (ता. 12) होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार आहे.

मनीषा राजेंद्र गावडे यांनी राजीनामा दिल्याने शिरूरचे नगराध्यक्षपद रिक्त झाले होते. सुरवातीची अडीच वर्षे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले. त्या वेळी उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे व सुवर्णा लटांबळे यांना संधी देण्यात आली. उर्वरित अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले. त्या वेळी सुनीता कालेवार व गावडे यांना संधी देण्यात आली. दहा महिन्यांची मुदत संपल्याने गावडे यांनी नुकताच नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोळगे या नगर परिषदेच्या प्रभाग क्र. दोनमधून निवडून आल्या असून, यापूर्वी त्यांनी महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद भूषविले आहे.
शिरुरच्या नगराध्यक्षा मनीषा गावडे यांचा राजीनामा
शिरूर, ता. ४ एप्रिल २०१६ (प्रतिनीधी)
एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने  शिरुरच्या नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त केला अाहे. पुढील नगराध्यक्ष निवड मंगळवारी (ता. 12) होणार अाहे.

शिरूर शहर विकास आघाडीची नगरपरिषदेवर एकहाती सत्ता अाहे. जास्तीत जास्त सदस्यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळावी, या साठी नगराध्यक्षपदावर काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याला मर्यादित कालावधी देण्याचे सुरवातीलाच ठरले होते. त्यानुसार शिरूर शहर विकास आघाडीच्या सदस्यांनी नियोजन केले होते.

शिरूरचे नगराध्यक्षपद सुरवातीचे अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेकरिता राखीव झाले. त्या अडीच वर्षांत उज्ज्वला बरमेचा, अलका सरोदे व सुवर्णा लटांबळे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. नंतरची अडीच वर्षे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले. त्या कालावधीत सुनीता कालेवार व मनीषा गावडे यांना नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. या वर्षअखेरीस नगर परिषदेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होणार अाहे.

नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर झाला असून, त्यानुसार मंगळवारी (ता. १२) दुपारी नगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारपर्यंत (ता. ५) आहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या