सणसवाडीत दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

सणसवाडी, ता. ५ एप्रिल २०१६ (शेरखान शेख)  : येथे अनेक वर्षांपासून रहिवासी असलेल्या कुटुंबातील काही युवक सोमवारी दुपारच्या सुमारास  बंधाऱ्यावर पोहण्यास गेले असता पाच युवकांपैकी दोन जणांचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला अाहे.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी  येथील काही युवक दुपारी येथील शेरी वस्ती येथे भीमा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. या ठिकाणी पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मुले पाण्यात बुडू लागली. यावेळी जवळ असलेल्या काही युवकांनी आरडाओरडा केला. या ठिकाणी होत असलेल्या आरडाओरड्याने काही नागरिक या ठिकाणी जमा झाले. या वेळी बुडत असलेल्या युवकांपैकी तीन युवक सुखरूप काठावर आले. परंतु, दोन युवक दिसलेच नाही. यावेळी तेथे एकच खळबळ उडाली. याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, भीमा नदीवरील या बंधाऱ्यावर अनेकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी बुडालेली मुले मिळू न आल्याने सणसवाडी येथील  वैभव यादव यांच्या मदतीने काही नागरिकांनी पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर समीर नजीर पठाण (वय २० रा. अंबिका नगर, सणसवाडी) व आकाश राजू गायकवाड (वय १७ रा. अंबिका नगर सणसवाडी, मूळ राहणार मिरजगाव ता. कर्जत जि. अहमदनगर) या दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

यातील समीर नजीर पठाण हा युवक आई वडिलांना एकुलता एक मुलगा असून त्याने नुकतीच शिक्रापूर येथे बारावीची परीक्षा दिलेली होती. या घडलेल्या प्रकारामुळे सणसवाडी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. दोन्ही मृतदेह बाहेर काढल्यानंतर दोन्ही युवकांचे शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत नजीर उस्मान पठाण यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या