मांडवगण येथील विठ्ठल उदमले झाले उपजिल्हाधिकारी !

मांडवगण फराटा, ता. 8 एप्रिल 2016- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत येथील शेतमजुराच्या कुटुंबातील विठ्ठल रोहिदास उदमले यांनी यश मिळविले असून ते उपजिल्हाधिकारी झाले आहेत. राज्यात त्यांनी पाचवा क्रमांक मिळविला आहे.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे तालुकाभर कौतुक होत आहे. सन 1972 च्या सुमारास उदमले कुटुंब येथे उदरनिर्वाहासाठी आले होते. आजोबा दशरथ उदमले हे आपली पत्नी व वसंत उदमले व रोहिदास उदमले या आपल्या दोन मुलांसह मांडवगण फराटामध्ये फराटे पाटील या बागायतदार शेतकऱ्यांकडे मोलमजुरीची कामे करू लागले. विठ्ठलचे वडील रोहिदास उदमले व आई मैना उदमले यांनी येथे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजुरीची कामे करून आपल्या तीनही मुलांना चांगल्या पद्धतीने शिकविले. मोठा मुलगा शिवाजी यास त्यांनी अभियांत्रिकीपर्यंत, तर विठ्ठल यास कला शाखेतून पदवीपर्यंत शिकविले, तर लहान मुलगा रवींद्र याचे पुण्यामध्ये काम करून पदवी शिक्षण चालू आहे.

विठ्ठल यांचे प्राथमिक शिक्षण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, तर पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेत झाले आहे. बारावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित श्री वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे यांच्या प्रेरणेतून पुण्यातील स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. इंग्रजी विषय घेऊन पदवी मिळविल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यास सुरवात केली. उपजिल्हाधिकारीपदाची त्याने दोन वेळा परीक्षा दिली. यामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत पोचता आले होते. मात्र, निवड झाली नव्हती. दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना यश आले व उपजिल्हाधिकारीपदावर निवड झाली.

आपल्या शैक्षणिक प्रवासामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, पंडित फराटे पाटील, राजीव फराटे पाटील, ज्ञानेश्वर पाटील फराटे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे विठ्ठल यांनी सांगितले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या