कोंढापुरी तलावात पाणी सोडण्याची मागणी

कोंढापुरी, ता. २४ एप्रिल २०१६ (प्रतिनीधी) : येथील तलावात चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून  त्वरित पाणी सोडावे, अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती मानसिंग पाचुंदकर यांनी केली आहे.

या संबंधी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,जिल्हाधिकारी सौरभ राव व तहसीलदार राजेंद्र पोळ यांना याबाबतचे निवेदन पाचुंदकर यांनी दिले आहे.उन्हाळ्याच्या तीव्रतेने कोंढापुरी तलावाने तळ गाठला असुन या पाण्यावर कोंढापुरी, रांजणगाव गणपती, वाघाळे, गणेगाव, खंडाळे, पिंपरी दुमाला आदी गावांच्या पाणी योजना अवलंबून आहेत. आता या तलावात आठवडाभर पुरेल एवढाच अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून,त्यानंतर सर्व गावच्या पाणीपुरवठा योजना बंद होण्याची शक्‍यता आहे.त्यामुळे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून या तलावात त्वरित पाणी सोडण्यात यावे अशी मागणी पाचुंदकर यांनी केली आहे.

रांजणगाव गणपती  व परिसरात पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून, अष्टविनायक महागणपतीचे देखील तीर्थक्षेत्र आहे. रांजणगाव गणपती येथील सुमारे 40 ते 50 हजार लोकसंख्येला पाण्याची सुविधा ग्रामपंचायतीने कोंढापुरी तलावातून केली आहे.त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले आहेत. तलावातील पाण्याची पातळी पूर्ण घटल्याने ही पाणी योजनाच बंद होण्याची शक्‍यता असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तसेच एप्रिलअखेरपर्यंत कोंढापुरी तलावात चासकमानचे पाणी सोडावे. पाणी सोडले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा माजी आमदार अॅड. अशोक पवार यांनी दिला आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने बहुतांश विंधन विहिरी बंद पडू लागल्या आहेत, त्यामुळे तालुक्‍यातील नागरिकांना पुढील आठवड्यात तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्‍यता आहे. चासकमानचे पाणी त्वरित सोडल्यानंतर जेमतेम एक महिनाभर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

नागरिकांनीही पाणी जपून वापरावे, असे आवाहन पवार यांनी केले.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या