विद्यार्थीनीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

शिरूर ,  ता.२७ जुलै २०१६ (प्रतिनीधी) : येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला मारहाण व विनयभंग केल्याप्रकरणी शंतनू मल्लाव व त्याच्या साथीदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित युवती सोमवारी सकाळी आपल्या सायकलवरून महाविद्यालयात जात असताना शंतनू व त्याच्या साथीदाराने पाबळ फाटा परिसरातून तिच्या मागोमाग जात निर्माण प्लाझा येथे मोटारसायकल आडवी लावून तिला थांबविले व "मला तुझ्याशी बोलायचे आहे, बाजूला चल‘, असे म्हणू लागला. तथापि, संबंधित मुलगी त्याच्याशी काहीही न बोलता आपल्या मैत्रिणींसह महाविद्यालयाच्या दिशेने निघून गेली.

दरम्यान, दुपारी चारच्या सुमारास शंतनू व हिरामण हे दोघे विद्यार्थिनी कक्षात घुसले. तेथे संबंधित मुलगी आपल्या मैत्रिणींसह थांबलेली असताना, मल्लाव याने हाताला धरून तिला ओढले व सकाळी माझ्याशी का बोलली नाही, म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर हिरामण याच्या चिथावणीवरून त्याने केसाला धरून तिला लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराने भयभीत झालेल्या इतर विद्यार्थिनींनी आरडाओरडा करताच सुनीती चौधरी, राजश्री नवले, नारायण काळे, रवींद्र गणोरकर, डी. के. मांडलिक या शिक्षकांनी सेवकांच्या साह्याने मुलीची सुटका केली. हा प्रकार कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावरूनच शंतनू व त्याचा साथीदार हिरामण हरिश्‍चंद्र चौधरी (रा. काची आळी, शिरूर) यांना ताब्यात घेतले.

संबंधित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीनंतर त्यांना अटक करण्यात आली.रस्त्यात अडवून मारहाण केल्याप्रकरणी; तसेच विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांना  अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली अाहे.
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या