पशुसंवर्धन विभागाला देखील अाली जाग

मलठण , ता.१८ अॉगस्ट २०१६ (प्रा.सुभाष शेटे,कवठे यमाई ) : मलठणच्या शिंदेवाडीत  गूढ आजाराने ३ बालकांचा  मृत्यू झाल्याने सार्वजनिक आरोग्य विभाग सतर्क झाला असतानाच.काल (ता.१७)रोजी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग देखील जागा होत गावात अधिका-यांनी पाहणी करत  गोचीड व गोमाशी निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक फवारणी केली अाहे.

शिंदेवाडीत वास्तव्यास असणारी जवळपास  सर्वच कुटुंबे मेंढपाळ व शेतकरी असल्याने तेथे असणारे जनावरांचे गोठे व परिसरात गोचीड व गोमाशी प्रतिबंधक उपाय योजना करण्याकामी आज जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभागा अंतर्गत शिरूर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉ. धनश्री ओव्हाळ, डॉ.प्रमोद रोकडे, सूर्यकांत भुजबळ, राहुल गायकवाड, एम डी नेहरकर यांच्या पथकाने शिंदेवाडीत दुपारी २ वाजल्यापासून डेल्टोक्स या गोचीड व गोमाशी प्रतिबंधात्मक औषधाची ३ पंपांच्या सहाय्याने फवारणी केली.

पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. धनश्री ओव्हाळ यांनी शिंदेवाडीतील जनावरांच्या अनेक गोठयांना भेटी देत नागरिकांना गोचीड,गोमाशाचा प्रतिबंध करण्याबाबत काय दक्षता घ्यावी या बाबत माहिती दिली. तर जनावरांचे गोठे व परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याचे आवाहन ओव्हाळ यांनी तेथील नागरिकांना केले.याचबरोबर ग्रामपंचायत मलठण व सार्वजनिक आरोग्य विभागाने २ फॉगिंग मशीन द्वारे डास निर्मूलन औषध फवारणी केली.
  
मलठण येथे शासनाचा श्रेणी २ मधील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना असून आज तालुका  विस्तार आधुनिका-यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय पथक गोचीड व गोमाशी प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यासाठी आलेले असताना मलठण येथे नियुक्तीस असलेले पशुधन पर्यवेक्षक एम के देंडगे आज शिंदेवाडीत फिरकले देखील नसल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
 

या बाबत पशुधन विकास अधिकारी  डॉ. धनश्री  ओव्हाळ  यांनी बोलताना सांगितले कि, तालुक्यातील शिंदेवाडीतील गूढ आजाराने घडलेली ३ बालकांच्या मृत्यूची घटना निशचितच क्लेशदायक आहे. जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी  आज येथे गोचीड व गोमाशी निर्मूलनाची मोहीम युद्ध पातळीवर सुरु केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत या करीता पशुसंवर्धन  विभागाकडून अत्यावश्यक उपाय योजना राबविण्यात येत आहेत
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या