शिरुर ला मोर्चात दिसली शिस्त अन एकी !

शिरूर , ता. ११ अॉक्टोबर  २०१६ (सतीश केदारी) : शिरसगाव काटा  येथे दाखल झालेल्या ‘अ‍ॅट्रॉसिटी’चा गुन्हा मागे घ्यावा आणि इतर मागण्यांसह सोमवारी शिरूर तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला.
 
सोमवारी(ता.१०) रोजी सकाळी 11 वाजता शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मोर्चास सुरुवात झाली. या मोर्चात शिरूर शहर पंचक्रोशी व तालुक्यातील नागरिक तरूण महिलावर्ग आबालवृद्ध सहभागी झाले होते. मोर्चामध्ये भगवे ध्वज, तसेच विविध मागण्यांचे फलक दिसत होते.

अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध असलेला हा एवढ्या मोठ्या प्रमाणातला मोर्चा शिरूर शहरात पहिल्यांदा अनुभवावयास मिळाला.  सुमारे 2 कि. मी. अंतर असलेला हा मोर्चा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून सरळ पुणे-नगर रोडवरून नगरपालिका रोडमार्गे बी. जे. कॉर्नरमार्गे सरळ तहसील कार्यालयात गेला. मोर्चातील अग्रभागी पाच मुली होत्या. मोर्चाचे एक टोक शिरूर तहसील कार्यालयापाशी, तर दुसरे टोक शिरूर नगरपालिकेशी होते.


या मोर्चात शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, तालुक्याचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, माजी नगरसेवक निलेश लटांबळे, दादा पाटील फराटे, दादा पाटील घावटे, संपदा पतसंस्थेचे प्रभाकर डेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे, पंचायत समिती सदस्या दिपाली शेळके, नगरसेवक प्रवीण दसगुडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदिप भोंडवे, सचिन पलंगे, शिवसनेचे तालुकाप्रमुख अनिल काशिद, शहर संजय देशमुख, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रंजन झांबरे, तसेच कुणाल काळे, सचिन जाधव, अनिल बांडे, अविनाश घोगरे, सतीश धुमाळ, संजय बारवकर, संजय बांडे, सुशांत कुटे, किरण पठारे, शेखर दळवी, प्रवीण आढाव, संजय शितोळे, साधना शितोळे, पुष्पा केवटकर आदी या मोर्चात उपस्थित होते.

शिरूर तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर या मोर्चात अग्रभागी असलेल्या ऐश्‍वर्या रणदिवे, प्रेरणा वारवकर, आदिती आढाव, सानिका खोडदे, ऋतुजा  खोले, या मुलींच्या हस्ते तहसीलदार राजेंद्र पोळ यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ऐश्‍वर्या रणदिवे व सानिका खोडदे यांची भाषणे झाली.

या वेळी दिलेल्या निवेदनात शिरसगाव काटा येथील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक संदिप आढाव, महिला माजी सरपंच धनश्री चव्हाण व इतरांवर दाखल झालेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा मागे घ्या.  मराठा समाजास आरक्षण मिळावे.  कोपर्डी बलात्कारप्रकरणी आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी योग्य ती कार्यवाही व्हावी. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी व्हावी व शेतीमालास योग्य तो हमी भाव निर्धारित करून द्यावा.  छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारकाचे काम तत्काळ सुरू व्हावे. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्यात. संजीव भोर यांना बजावण्यात आलेली तडीपारीची नोटीस रद्द करावी, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या.

 
Comment Box is loading comments...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या