कोयत्याने मारहाण प्रकरणी आठ वर्षे कारावास

तळेगाव ढमढेरे, ता.१५ डिसेंबर २०१६ (शिक्रापुर प्रतिनीधी) : तळेगाव ढमढेरे येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये एकाने भावकीतील एकास कोयत्याने मारहाण करून जबर जखमी करत त्याचा उजवा हात मनगटापासून वेगळा केला होता, या बाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी दिपक उर्फ खंडू दिगंबर नरके यास न्यायालयाने आठ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

याबाबत हकीकत अशी कि, आरोपी दिपक उर्फ खंडू दिगंबर नरके याने फिर्यादी दुर्गा गोरक्ष नरके यांच्या वडिलांनी वडिलोपार्जित जमीन विकण्यासाठी संमती दिली नाही याचा राग मनात धरून फिर्यादी दुर्गा यांचा धाकटा भाऊ हरीओम गोरक्ष नरके यास कोयत्याने डोक्यात, हातावर, पायावर, कानावर वर करून त्याचा उजवा हात मनगटापासून वेगळा करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

या बाबत दुर्गा गोरक्ष नरके रा. तळेगाव ढमढेरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. तर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध भा. ड. वि कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महादेव पाटील व पोलीस हवालदार उमेश जगताप यांनी योग्य पद्धतीने केला.

योग्य पुरावे व साक्षीदार तपासात न्यायालयाने आरोपी दिपक उर्फ खंडू दिगंबर नरके रा. तळेगाव ढमढेरे  यास आठ वर्षे कारावास तसेच पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या