बॅंकांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास अखेर सुरवात

नवी दिल्ली, ता. 22 डिसेंबर 2016: रिझर्व्ह बॅंकेने पाचशे व हजाराच्या जुन्या नोटा जमा करण्याबाबतचा नियम मागे घेतल्यानंतर बॅंकांनी बुधवारी कोणत्याही चौकशीविना जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरवात केली.

नोटाबंदी झाल्यानंतर जुन्या नोटा जमा करण्यास 30 डिसेंबरची अखेरची मुदत देण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेने हा नियम मागे घेऊन "केवायसी' असलेल्या खातेधारकांनी कितीही प्रमाणात जुन्या नोटा जमा केल्यास त्यांची चौकशी करण्यात येणार नाही, असे जाहीर केले. हा आदेश बॅंकांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी न येता कामकाज सुरू झाल्यानंतर आला. त्यानंतर बॅंकांनी पाच हजार रुपयांपेक्षा अधिक जुन्या नोटा स्वीकारण्यास सुरवात केली.

बँकेत पाच हजारांहून जास्त रक्कम एकदाच भरता येणार
नवी दिल्ली, ता. 20 डिसेंबर 2016 -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर पैशाचा काळाबाजार रोखण्यासाठी आणखी एक निर्बंध लादण्यात आला आहे. पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांद्वारे पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यात जमा करण्यावर रिझर्व्ह बँकेने सोमवारी कठोर निर्बंध लादले. बाद नोटांद्वारे ३० डिसेंबरपर्यंत एका खात्यात फक्त एकदाच पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम भरता येईल.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नव्या निर्देशानुसार, ५००० रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा भरण्यासाठी कोणतीही अट नाही. मात्र एकाच खात्यात त्यापेक्षा अधिक जुन्या नोटा जमा होऊ लागल्यास त्याबद्दलही बँकेकडून विचारणा केली जाईल. तसेच त्यासाठी केवायसीची पूर्तता करावी लागेल. ज्यांनी केवायसीची पूर्तता केलेली नाही त्यांना एकदाच जुन्या नोटांच्या स्वरूपात ५० हजारांपेक्षा अधिक रक्कम बँकेत भरता येणार नाही, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले.

पीएमजीके योजनेत काळा पैसा बाळगणारे बेहिशोबी पैसा जमा करू शकतात. त्यांना त्यासाठी 50 टक्के कर भरावा लागेल व राहिलेल्या रकमेचा २५ टक्के भाग चार वर्षांसाठी बिनव्याजी ठेवावे लागेल. जुन्या नोटांद्वारे पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबरपर्यंत खात्यात एकदाच भरता येईल. जास्तीची रक्कम भरणाऱ्यास बँकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही रक्कम यापूर्वी का भरली नाही याचा समाधानकारक खुलासा करावा लागेल. या खुलाशाची नोंद करून नंतर आॅडिटच्यावेळी त्याचा उपयोग केला जाईल.

'PF'चा व्याजदर झाला कमी...
बंगळूर:
कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (EPFO) चालू आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. 2016-17 या आर्थिक वर्षासाठी त्यांच्या ठेवींवर 8.65 टक्के दराने व्याज मिळणार आहे. मागील वर्षी (2015-16) निधीवर 8.8 टक्के व्याज देण्यात आले होते.

अर्थ मंत्रालयाने EPFO च्या पाच कोटींहून अधिक सदस्यांना 8.75 टक्के दराने व्याज मिळावे अशी भूमिका घेतली होती. मात्र ईपीएफवर इतके व्याज न देण्याची भूमिका जाहीर केली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षाप्रमाणेच 2016-17 या आर्थिक वर्षातही ईपीएफवर व्याजदर 8.8 टक्के इतका मिळण्याचे बोलले जात होते. यासंबंधी केंद्रीय विश्वस्त मंडळाची सोमवारी येथे झालेल्या बैठकीत भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर 8.65 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या