तिकीट हाडाच्या कार्यकर्त्याला की पैशेवाल्याला?

शिरूर, ता. 23 जानेवारी 2016 (सतिश केदारी/तेजस फडके)- शिरूर तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहीर झाल्यापासून तिकीट मिळविण्यासाठी अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. परंतु, खरा प्रश्न आहे की तिकीट कोणाला मिळणार? वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणाऱया सामान्य कार्यकर्त्याला की धनदांडग्यांना? हे काही दिवसांतच पहायला मिळेल.

शिरूर तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका पुढील महिन्यात होत आहेत. पंचायत समिती व जिल्हा परिषदेला उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकजण दंड थोपटून उभे आहेत. परंतु, धनदांडग्यांच्या पुढे आपली डाळ शिजेल का? असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात घोळू लागला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केले आहे. परंतु, उमेदवारी देण्याची वेळ आली की पक्षातील ज्येष्ठ नेते आर्थिक परिस्थीती पाहतात अन् तिकीट देण्याचे टाळतात. यावेळी सुद्धा हाच निकष लावला जाणार का? असा प्रश्न अनेकांच्या पुढे उभा आहे.

दुसऱया बाजूला अनेक धनदांडगे पैशाच्या जोरावर तिकीट मिळविताना दिसत असल्याचा इतिहास आहे. या निवडणूकीतही हेच होणार असेल तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी राजकारण सोडावे का? अन् धनदांडग्यांच्या पुढे-पुढे करून आयुष्य वाया घालवावे का? उमेदवारी देताना किमान कार्यकर्त्याचे काम पाहिले जावे. प्रत्येकवेळी आर्थिक निकष लावला जाणार असेल तर आम्ही राजकारण सोडून घरी बसावे का? असा सवाल नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका कार्यकर्त्याने उपस्थित केला आहे.

राजकारणापायी अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. पक्षाचे काम करूनही तिकीट तर सोडा परंतु पदही मिळत नाही, अशी अनेकांची परिस्थिती आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुढेपुढे करणे. सतत त्यांच्यासोबत फिरणे व मोठ-मोठ्या रक्कमा खर्च करणाऱयांनाच आज पक्षामध्ये अथवा विविध कार्यक्रमांमध्ये मान मिळत असल्याचे चित्र जवळपास सर्वच पक्षांमध्ये दिसत आहे. पक्ष जणू आपणच चालवत असल्याचे धनदांडग्यांना वाटत आहे. मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरणे अन् पैशांची उधळपट्टी करणे म्हणजे राजकारण असा त्यांचा समज झाला आहे. परंतु, सोशल नेटवर्किंगने संपुर्ण चित्र पालटले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या व सामाजिक कामे करणाऱयांना मतदारांचा नक्कीच पाठिंबा मिळत असल्याचे चित्र जगभर पहायला मिळत आहे.

सोशल नेटवर्किंगचा प्रभाव वाढत असताना या निवडणूकांमध्ये पक्षाची उमेदवारी कोणला मिळणार? पैशाचा हे पुढील काही दिवसात पहायला मिळणार आहे. दरम्यान, आर्थिक परिस्थिती नसली तरी सामाजिक कामे करणाऱया कार्यकर्त्यांच्या पाठीशी www.shirurtaluka.com सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून उभी राहणार आहे.

संबंधित बातम्या-

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या