पैशाचा पाऊस पाडणा-या भोंदूबाबांचा पर्दाफाश

शिक्रापूर, ता.२४ जानेवारी २०१७ (विशेष प्रतिनीधी) : पैशाचा पाऊस पडतो असे नागरिकांना सांगून लुटणाऱ्या तीन भोंदू बाबांना पकडण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले अाहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिक्रापूर येथील अमोल शशिकांत वाबळे हे शिक्रापूर येथील सान्व्ही रेसिडेन्सी सोसायटीमध्ये फेब्रीकेशनचे काम करत असताना तेथे दाढी वाढलेले व भगवे कपडे घातलेले दोन भोंदू आले. त्यांनी अमोल वाबळे यास तुझेकडे फार लक्ष्मी आहे, तुझ्याकडे खूप धन आहे तू इकडे ये असे म्हणत जवळ येण्यास सांगितले.व तुझ्या धंद्यात काही अडचणी असतील तर आमचे आळंदी येथील गुरुमहाराज दूर करतात असे सांगितले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवत फुंकर मारली. आणि झोळीतून जुन्या काळातील पाच रुपयांची नोट काढून हि दैवी शक्तीची नोट आहे हि कोठेच मिळत नाही असे सांगितले. या नोटेचा विधी केल्यास तुझ्या मनात काय आहे ते तुला प्राप्त होईन असे सांगत अमोल वाबळे याचे जवळील एक रुपयाचा ठोकळा घेऊन तो आम्ही आळंदी येथील महाराजांना दाखवू असे म्हणून अमोल चा मोबाईल नंबर घेऊन ते निघून गेले.

दुसऱ्या दिवशी अमोल यास फोन करून तुझ्याजवळचा ठोकळा खरा आहे त्यासाठी पूजा करायची आहे आणि त्याला पूजेचे साहित्य आणावे लागेल असे सांगितले यानंतर अमोल वाबळे व आदित्य विरोळे यांनी आळंदी येथे जाऊन पूजेचे साहित्य आणण्यासाठी नऊ हजार रुपये रोख स्वरुपात दिले. यांनतर दुसऱ्या दिवशी पूजेचे साहित्य आणलेले असून पूजेचा विधी करण्यासाठी निश्चित ठिकाण सांगतो असे सांगितले व शिक्रापूर एसटी स्थानक येथे जा तेथे एक महाराज बसलेले आहेत ते तुम्हाला आमच्याजवळ घेऊन येतील असे सांगितले. यांनतर अमोल वाबळे व आदित्य विरोळे हे शिक्रापूर एसटी स्थानकात गेले असता तेथे असलेल्या एका भोंदूबाबाने त्या दोघांना स्मशानभूमीत नेले.

 स्मशानभूमीत एका महाराजाने काही वस्तूंची पूजा मांडलेली होती तेथे गेल्यानंतर त्या भोंदूबाबांनी एका मडक्यात एक रुपया टाकून त्याला लालकापडाने बांधले व पूजेच्या पाया पडून उदबत्तीने स्मशानभूमीस ओवाळण्यास सांगत बाजूला जाऊन बसण्यास सांगितले काही वेळाने त्या मडक्यातून पन्नास रुपयांच्या दीडशे ते दोनशे नोटा बाहेर काढल्या व त्यातील पाच नोटा यांना देऊन बाजारच चालून बघण्यास सांगितले व आम्हाला पैशाचा पाऊस पडता येतो असे सांगत विश्वास संपादन करून त्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागेल असे सांगितले.

यांनतर परत वाबळे यास पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काही विधी करायचा असून त्यासाठी स्मशानी धूप आणायचा आहे असे सांगितले यांनतर वाबळे याने स्वतः धूप आणला असता हा धूप तू कोठून आणला तो तर फक्त आश्रमात मिळतो असे सांगून दुसऱ्या दिवशी पुन्हा धूप आणण्यासाठी एक लाख रुपये मागितले.

त्या भोंदूबाबांनी वाबळे यास संगमनेर येथील बँकेचे खाते नंबर देऊन त्यामध्ये पैसे टाकण्यास सांगितले यांनतर वेळोवेळी या भोंदूबाबानी विधीमध्ये अडथला येत आहे असे सांगून अमोल वाबळे याचेकडून ऐकून चार लाख एकोणतीस हजार रुपये लाटले.

 पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फसवणूक केल्याबाबत अमोल शशिकांत वाबळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असता शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सागरनाथ मिठानाथ परमार वय – ६५, चंदुनाथा सागरनाथ परमार वय – २३, तसेच पटेलनाथ सम्जुनाथ चौहान वय – ६७ रा. सतलासा ता. सतलासा जी. म्हैसाणा राज्य गुजरात सध्या राहणार सासवड ता. पुरंदर जी. पुणे यांना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली अाहे.

अारोपींकडून जुन्या काळातील पाच रुपयांची नोट, एक रुपयाचे नाणे, होमविधी करण्यासाठी वापरलेल्या रुद्राक्षाच्या माळा, मानवी कवटीसारख्या दिसणाऱ्या माळा, बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड असे साहित्य जप्त केले.

 त्यांच्या विरुद्ध भा. द. वि. कलम ४२० तसेच महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ चे कलम २ (१), ३ (१) (२), ३ (१) (३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २६ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या