शिरूर तालुक्यातून वेठबिगारीसाठी ज्येष्ठाची विक्री

शिरूर, ता. 11 मार्च 2017 (प्रतिनिधी)- शिरूर तालुक्यातून वेठबिगारीच्या कामाकरिता ज्येष्ठ नागरिकाला विकण्याचा प्रकार तालुक्‍यात उघडकीस आला असून, यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

मुनीर रहिमान जखाते (रा. कुरुळी, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुधाकर गौतम भोसले (रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. नगर), शंभू कुंजा चव्हाण (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा) व संतोष सदाशिव टुले (रा. वाघोली, ता. हवेली) यांच्याविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुनीर जखाते यांचे भोळसर असलेले वडील रहिमान रसुलभाई जखाते (वय 60) हे गेल्या शनिवारी (ता. 4) घरातून निघून गेले होते. दरम्यान, त्यांचा मुनीर व इतरांनी तालुक्‍यातील कोळगाव डोळस, वडगाव रासाई, शिरसगाव काटा, पिंपळसुटी; तसेच श्रीगोंदा तालुक्‍यातील लोणी व्यंकनाथ परिसरात शोध घेतला, परंतु त्यांचा ठावठिकाणा सापडू शकला नाही. त्यामुळे मुनीर यांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार शिरूर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनीही जखाते कुटुंबीयांसह परिसरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बेपत्ता जखाते हे येळपणे (ता. श्रीगोंदा) येथील एका वस्तीवर पाहिल्याची माहिती मिळाली.

जखाते कुटुंबीयांनी पोलिसांसह त्या वस्तीवर जाऊन चौकशी केली असता, संबंधित बेपत्ता नागरिक तेथे सापडले नाहीत. परंतु, पोलिसांनी तेथून सुधाकर भोसले व शंभू चव्हाण यांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्‍या दाखविताच, "आम्ही संबंधित व्यक्तीस येळपणे येथून आमच्या वस्तीवर आणले होते. मंगळवारी (ता. 7) त्यांना संतोष टुले या व्यक्तीला दोन हजार रुपयांच्या मोबदल्यात वेठबिगार कामासाठी विकले,' अशी कबुली त्यांनी दिली.

सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलिस हवालदार श्रावण गुपचे, गुरू जाधव, संतोष औटी यांनी वाघोली येथून टुले याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या रहिमान जखाते या ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या नातेवाइकांकडे सोपविले. या वेळी कुरुळी परिसरातून अनेक नागरिकांनी शिरूर पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. टुले याच्यासह भोसले व चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केल्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.

भोळसर, वेडसर व्यक्तीला गाठायचे अन्....
भोळसर व वेडसर व्यक्तीला गाठायचे आणि त्याला मजुरीसाठी किंवा वेठबिगारीसाठी थोड्या पैशांच्या मोबदल्यात विकायचे, बांधकामावर राबवून घ्यायचे, असे प्रकार तालुक्‍याच्या काही भागांत या पूर्वीही झाल्याचे या वेळी नागरिकांनी सांगितले. जेवणाच्या मोबदल्यात अशा व्यक्तींकडून मोठ्या कष्टाची कामे करून घेतली जात असल्याच्या व त्यासाठी टोळी कार्यरत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या