वंशाच्या दिव्याप्रमाणे वंशाच्या पणतीचेही स्वागत करावे

शिक्रापुर, ता.१३ मार्च २०१७(प्रा.एन.बी.मुल्ला) : वंशाच्या दिव्याप्रमाणे वंशाच्या पणतीचेही स्वागत करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिक्रापूर रोटरी क्लबचे नियोजित अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र गायकवाड यांनी केले.

शिक्रापूर येथील कस्तुरी शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिना निमीत्त आयोजित किशोरवयीन मुला मुलींच्या मेळाव्यात डॉ.गायकवाड बोलत होते.स्त्री भ्रूण हत्या एक सामाजीक समस्या या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले की भावी पिढी जन्माला घालणारी माता जिवंत ठेवायची असेल तर प्रत्येक स्त्रिने सावित्री व पुरूषाने ज्योतिबा बनण्याची गरज असून या गोजिरवाण्या घरात स्त्री जन्माचे स्वागत करणे ही काळाची गरज आहे.

या कार्यक्रमात डॉ.शरद लांडगे यांनी किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य, लैंगीक शिक्षण, प्रजनन संस्था याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी स्त्रि भ्रूण हत्या रोखण्याविषयी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कस्तुरी शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व महिला स्वच्छता दुतांचा भेटवस्तू देवून सन्मान  करण्यात आला.या कार्यक्रमास कस्तुरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, प्राचार्य डॉ.रमेश कळमकर, प्रा.पवार, शिक्रापूर रोटरीचे अध्यक्ष लध्दाराम पटेल, डॉ.शरद लांडगे, अॅड.रावसाहेब करपे, प्रा.संजय देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रमेश कळमकर यांनी केले.प्रा.मंगल बैनाडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.उज्वला चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या