शिरुरकर प्रामाणिक अधिका-यांच्या पाठीशी-पाचर्णे (Video)

शिरुर, ता. २७ मे २०१७ (सतीश केदारी) : शिरुर तालुका हा कर्तव्यदक्ष अधिका-यांच्या नेहमी पाठीशी उभा राहत असल्याचे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी बोलताना व्यक्त केले.शिरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या निरोप समारंभावेळी प्रमुख पाहुणे ते  बोलत होते.

पाचर्णे पुढे बोलताना म्हणाले कि, शासन व प्रशासन ही एकाच रथाची चाके असुन हे दोन्ही चाके सुरळित चालण्यासाठी समन्वयाची नेहमी गरज असते.शिरुर तालुक्यात येणा-या अधिका-यांवर दबाव वा हस्तक्षेप होत नसल्याने अधिकारी देखिल तितक्याच क्षमतेने काम करत असुन सर्वसामान्य जनता ही कर्तव्यदक्ष अधिका-याच्या पाठीशी उभी राहतेच.या वेळी बोलताना पोलीसांच्या कामकाजात अद्याप कधीच हस्तक्षेप केला नसल्याचे पाचर्णे यांनी आवर्जुन नमुद केले.शिरुरकरांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना दयानंद गावडे हे म्हणाले कि, शिरुर पोलीस स्टेशन हद्दीत ढासळलेली कायदयाची घडी पुर्ववत करण्यासाठी प्रारंभी नेमकी सुरुवात कोठुन करावी हेच समजत नव्हते.तेव्हा प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करत गुन्हेगारांची कुंडली तयार केली.त्यानुसार फास्ट पोलीसिंग राबवत गुन्हेगारांवर एकप्रकारे जरब निर्माण केली.त्याचप्रमाणे जनतेत पोलीसांची प्रतिमा स्वच्छ करण्याचे प्रथम काम करुन विश्वास निर्माण केला. प्रारंभी प्रतिबंधात्मक कारवाया जास्त केल्या.सन २०१५ मध्ये ५ दरोडे हे त्यांची संख्या कमी करत सन २०१६ मध्ये एकही दरोड्याची नोंद नाही.जबरी चोरी ची १५ वरुन ३ अशी संख्या कमी केली.२७ घरफोड्यांवरुन ६ घरफोड्यांची २०१६या वर्षात झाली. अदखलपाञ गुन्हयांची देखिल कमी नोंद झाली असुन एकमेकांरुद्ध विरुद्ध केल्या जाणा-या एकही तक्रारीची नोंद होउ दिली नसल्याचे त्यांनी सांगितले.गुन्हयात चोरी गेलेली रोख रक्कम कधीही परत मिळत नाही परंतु येथील चोरी गेलेल्या १६ लाख रक्कमेपैकी ३०% रक्कम त्या मालकाला परत करण्यात आल्याचे सांगुन त्या गुन्हयातील आरोपींमुळे १० मोठे गुन्हे उघडकिस आल्याचे देखिल त्यांनी आवर्जुन नमुद केले.मल्लाव खुन प्रकरणाविषयी बोलताना त्यांनी सांगितले कि, त्या प्रकरणात ९९% चुक पोलीसांची नव्हतीच परंतु त्यावेळी येथील अनुभव नसल्याने  त्या घटनेचा खेद वाटतो असेही या वेळी स्पष्ट करत जनतेने दिलेली साथ लाखमोलाची असल्याचे ते म्हणाले.

शिरुरकरांविषयी भरभरुन बोलताना आतापर्यंतच्या आयुष्यात सर्वांत चांगले नागरिक,पञकार या ठिकाणी लाभले असुन शिरुरकरांना कधीच विसरणार नसल्याचे सांगत पोलीस खात्याविषयी आत्मियता निर्मान केल्यानेच गावोगावचे सर्वसामान्य नागरिक शिरुर पोलीस स्टेशनला भेट द्यायला यायचे.नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी सर्वांना विश्वासात घेउन काम करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.

शिरुर चे तहसिलदार राजेंद्र पोळ यांनी देखिल वर्गमिञाविषयी भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी शिवसेनेचे पोपट शेलार, संजय देशमुख,बानुराव पाचंगे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे,माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मनोगते व्यक्त केले.या वेळी पोलीस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, महिला दक्षता  समिती च्या शोभना पाचंगे, राणीताई चोरे, सर्व पोलीस कर्मचारी व  तालुक्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर यांनी केले.सुञसंचालन रावसाहेब चक्रे यांनी केले तर आभार सोमनाथ वाघमोडे यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या