शिरूर तालुक्याचे 'फेव्हरेट' ठरले सुर्यकांत पलांडे !

शिरूर, ता. 21 जून 2017 (सतीश केदारी): शिरूर तालुक्याचे 'फेव्हरेट' म्हणून माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांची निवड झाली आहे. नऊ क्षेत्रांमधून निवडणून आलेल्या इतर मान्यवरांनी एकमताने पलांडे यांची 'फेव्हरेट' म्हणून निवड केली.

राज्यात शिरूर तालुक्याचे प्रथम संकेतस्थळाचा मान पटकाविलेल्या www.shirurtaluka.comने 06 एप्रिले ते 22 मे 2017 या कालावधीमध्ये लोकशाहीपद्धतीने मतचाचणी घेतली होती. मतचाचणीदरम्यान 1) सामाजिक, 2) राजकीय, 3) शैक्षणिक, 4) धार्मिक, 5) क्रीडा, 6) कृषी,  7) महिला,  8) पत्रकार 9) प्रशासकीय या क्षेत्रांमधून प्रत्येकी पाच जणांमधून प्रत्येकी एकाची म्हणजेच नऊ मान्यवरांची निवड झाली आहे.

'फेव्हरेट'साठी निवड झालेले मान्यवर पुढीलप्रमाणे:
श्री. सुर्यकांत पलांडे * डॉ. अंकुश लवांडे * डॉ. एकनाथ खेडकर * श्री. मकरंद देव * श्री. दादा उदमले * श्री. रघुनाथ शिंदे * सौ. दिपाली शेळके * श्री. नितीन बारवकर * दयानंद गावडे

या मान्यवरांमधूनच शिरूर तालुक्याचा एक 'फेव्हरेट' ठरणार होता. परंतु, या मान्यवरांनी सर्वानुमते निर्णय घेत माजी आमदार सुर्यकांत ऊर्फ काकासाहेब पलांडे यांची निवड केली. पलांडे यांचा नुकताच 75वा वाढदिवस साजरा झाला आहे. विविध क्षेत्रातील नऊ मान्यवरांनी त्यांची निवड सार्थ ठरवत एकप्रकारे त्यांना वाढदिवसाची भेट दिली. शिवाय, या मान्यवरांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत लाडक्या कांकावरील प्रेम व्यक्त केले आहे.

दरम्यान, संकेतस्थळाने सहाव्या वर्धापनदिनानिमित्त शिरूर तालुक्याचा 'फेव्हरेट' कोण? हे तुम्हीच ठरवा... हे वृत्त प्रसारीत केले होते. शिरूर तालुक्यातील नेटिझन्सनी आपल्या मनातील मान्यवराचे नाव ई-मेल व प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळविले होते. सर्वाधिक पसंती असलेल्या 45 मान्यवरांचे नाव 'फेव्हरेट'साठी घेण्यात आले होते. पुढे विविध क्षेत्रातील मतचाचणी घेण्यात आली. मतचाचणीला दीड लाखाहून अधिक नेटिझन्सनी प्रतिसाद देत आपले मत नोंदविले होते. या मतचाचणीमधूनच एक-एक मान्यवराची निवड होत गेली. विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे 45 मान्यवर हे विजयी उमेदवार आहेतच. परंतु, 'फेव्हरेट'साठी एका मान्यवराची निवड होणे अपेक्षित होते. अखेर शिरूर तालुक्याचा 'फेव्हरेट'म्हणून पलांडे यांची निवड झाली आहे. संकेतस्थळाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या