वाढदिवसाचा खर्च टाळत 'त्या' कुटुंबाला आर्थिक मदत

शिंदोडी, ता. २६ जुन २०१७ (तेजस फडके) : शिंदोडी (ता.शिरूर) येथील सामाजिक कार्यकर्ते शिवलिंग वांगणे यांनी वाढदिवसाचा खर्च टाळत दिवंगत सहकार्याच्या परिवारास आर्थिक मदत देऊन आपला वाढदिवस साजरा केला.

शिंदोडी लगत असणाऱ्या गुनाट (ता. शिरूर) येथील नामांकित मल्ल कै. दादासाहेब थोरात यांचे २० मार्च रोजी निधन झाले. कै. दादासाहेब थोरात हे एक गरीब घरातील नामांकित मल्ल होते. आपल्या कुस्ती क्षेत्रातील कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र चौम्पियन हा किताब पटकावत परिसराचे नांव गाजवले होते. मात्र कुस्तीक्षेत्रामध्ये 'करिअर 'करताना त्यांचे स्वतःच्या आर्थिक परिस्थिती व कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले. त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच राहिली. यावर्षी मार्च महिन्यांत त्यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांच्या दोन पत्नी, सहा मुली, दोन मुले एवढा परिवार निराधार झाला. दोन मुलींची लग्ने झाली असून, चार मुली आणि दोन मुले आहेत. दोन मुली इ.१०वी, एक मुलगी इ., ८वी, एक मुलगी इ.७वी, एक मुलगा इ.४थी व एक मुलगा इ.२रीमध्ये शिक्षण घेत आहेत.

या मुलांच्या शिक्षणाचाही मोठा खर्च आहे. उदरनिर्वाहाबरोबरच मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे. त्यांच्या पश्चात कुटुंबाकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने परिवारावाराची स्थिती आजही हालाखिची आहे. त्यांच्या दशक्रियाविधिच्या कार्यक्रम प्रसंगी अनेक मल्ल व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी या परिवारासाठी मोठी आर्थिक मदत जाहिर केली. हा जाहिर झालेला मदतीचा आकडा त्यावेळी पाच लाख रुपये झाला होता. त्यावेळी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, त्यानंतर काही ठराविक लोक सोडले तर अनेकांना या जाहिर केलेल्या मदतीचा विसर पडला आहे. ही मदत त्यांना अद्यापही मिळालेली नाही. त्यांची पत्नी या दात्यांच्या घरांचे उंबरे झिजवत आहे, फोनव्दारे संपर्क साधत आहे. मात्र मदतीसाठी पुढचा वायदा केला जात आहे.

या पाश्र्वभूमिवर शिंदोडी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शिवलिंग वांगणे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च आणि झगमगाट टाळुन या परिवारास किराणा माल आणि आर्थिक मदत सुपूर्त करत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी शिंदोडी ग्रामपंचायात सदस्य एकनाथ वाळुंज, शिरूर तालुका शेतकरी सेना प्रमुख योगेश ओव्हाळ, शांताराम आखुटे, रामकृष्ण गायकवाड, कृष्णकुमार माने यांसह अनेक जण उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या