शिरूर बाजार समिती निवडणूकीत महत्त्व फक्त पैशाला !

शिरूर, ता. 26 जून 2017 (सतीश केदारी): शिरूर बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली असून, निवडणूकीदरम्यान मतदारांवर वारेमाप खर्च करण्यात आला. शेतकऱयांविषयी फारशी कोणालाही कळवळ नसून, निवडणूकीदरम्यान फक्त पैशाला महत्त्व दिले गेले, अशी माहिती www.shirurtaluka.comने घेतलेल्या मतचाचणीवरून पुढे आली आहे.

संकेतस्थळाने 16 जून ते 25 दरम्यान बाजार समिती निवडणूकीविषयी मतचाचणी घेतली होती. नेटिझन्सने मोठ्या प्रमाणात मत नोंदवून धनधांडग्यांविरोधात आपले मत मांडले आहे.

शिरूर बाजार समिती निवडणूकीदरम्यान खालीलपैकी कशाला महत्व दिले जाते?
    1) पैसा - 73 टक्के
    2) शिक्षण - 3 टक्के
    3) राजकीय पक्ष - 6 टक्के
    4) शेतकऱयांविषयी कळवळ - 12 टक्के
    5) अन्य - 6 टक्के


शिरूर बाजार समिती निवडणूक केवळ पैशावर आधारीत केंद्रीत असते असे 73 टक्के जणांना वाटते. या निवडणूकीत शिक्षणाला महत्त्व दिले जात नसल्याचेही दिसून आले आहे. यामुळे बाजार समितीच्या संचालकाला शिक्षणाचे ज्ञान नसेल तर पुढे काही बोलायलाच नको... या निवडणूकीत एक विजयी झालेल्या उमेदवार तर अशिक्षितच आहे. केवळ पैशाचा वापर केल्याने ते निवडूण आल्याचे बोलले जात आहे. विवाहातील पत्रिकांवर नावांसाठीच एवढा आटापिटा केला जात असल्याचेही अनेकजण बोलत आहे. राजकीय पक्ष व अन्य कारण नसल्याचे 6 टक्के जणांना वाटते तर शेतकऱयांविषयी कळवळ असल्याचे 12 टक्के जणांना वाटत आहे.

संकेतस्थळाने घेतलेल्या मतचाचणीवरून सर्व परिस्थिती समोर येत आहे. निवडणूका आणि पैसा हे समिकरणच झाले आहे. यामुळेच प्रत्येक निवडणूकीमध्ये धनदांडग्यांना 'विशेष' न्याय दिला जात असल्याचेही अनेकजण अनुभवत आहेत. बाजार समितीच्या निवडणूकीमध्येही मत विकत घेण्यावर मोठी रक्कम मोजली गेली. यामध्ये अनेकांचे खिसे गरम झाले आहेत. पत्रिकांवर व सन्मानासाठीच एवढा आटापिटा केला जात असल्याची चर्चाही नागरिकांमध्ये आहे.

बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर सभापतिपदावरूनही मोठे राजकारण झाले. शेतकऱयांविषयी खरंच काही करण्याची ईच्छा असेल तर पदांची आवश्यकता लागत नाही, हे राज्यातील शेतकऱयांनी केलेल्या आंदोलनावरून पहायला मिळाले आहे. परंतु, तालुक्यात पदांसाठी केवढा आटापिटा केला जात आहे, हे दिसून येत आहे. पैशाच्या जोरावर मोठ-मोठी पद पदरात पाडून घ्यायची अन् मान-सन्मान मिळवायचे. पद नाही मिळाली तर नाराजी अन् राजीनामा ठरलेला आहेच, अशीही चर्चा शेतकऱयांमध्ये आहे.

दरम्यान, यापुढे निवडणूक लढविताना सर्व विचार करणे गरजेचे आहे. सोशल मिडियामुळे एका सेंकदात चर्चा व्हायरल होत असून, नेटिझन्स परखडपणाने आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या