अवैध गुटखाविक्रीवर कारवाईस प्रशासन असमर्थ ?

शिरुर,ता.७ अॉक्टोबर २०१७ (धर्मा मैड) : शिरुर शहर व तालुक्यात  बेकायदेशीररित्या  गुटखा विक्रीच्या माध्यमातून करोडो रूपयांची   उलाढाल होत असताना या बेकायदा गुटखा विक्रीबाबत  ठोस कारवाई करून राज्य शासनाच्या  गुटखा बंदी आदेशाची  अंमलबजावणी करण्यास प्रशासकिय यंत्रणा असमर्थ असल्याचे उघडपणे दिसत असुन शिरुर तालुक्यासह शहरात बेकायदेशिर गुटखा विक्री जोमात असल्याचे दिसत आहे.

राज्यात बंदी असतानाही  शिरुर तालुक्यासह शहरात सर्रासपणे गुटख्याची  विक्री होत आहे.गावपातळीवर पानाच्या टपरीपासुन ते किराणा दुकानापर्यंत तसेच शहरात गल्लोगल्ली,कोपरा-कोप-यावर, नाका-नाक्यांवर हा गुटखा सहज उपलब्ध होतो.त्यामुळे गुटख्यावर बंदी आहे कि नाही ?  याबाबत संकेतस्थळाने वेळोवेळी आवाज उठविला.परंतु प्रशासकीय यंत्रणेकडुन याबाबत आज पर्यंत  कुठलीही  ठोस कारवाई झालेली निदर्शनास आलेली नाही.त्यामुळे हा गुटखाबंदीचा फार्स कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो.

इतक्या सहजपणे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ सहजपणे उपलब्ध होत  असल्याने या मागे मोठे अर्थकारण असुन गुटखाबंदी असतानाही अशा अवैध विक्रेत्यांची माहिती अन्न व औषध विभाग व पोलीस प्रशासनाला माहितच नाही कि याचं गांभिर्य या विभागाला नाही असा सवाल व्यक्त केला जात आहे.राज्यात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर निर्बंध असुन राजरोसपणे होत असलेल्या विक्रीमुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसुल बुडत  आहे.माञ या गोष्टीकडे संबंधित विभाग पुर्णपणे दुर्लक्ष करत  असुन राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.

राज्यात तरुणपिढी तंबाखूजन्न पदार्थांच्या व्यसनापासुन दुर ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन  सर्वञ गुटखा व तंबाखुजन्य पदार्थांवर शासनाने  गुटखा विक्रीवर बंदी आणली असताना बहुतांश शासकिय कार्यालयातील कर्मचारीच खुलेआम नागरिकांसमोर गुटखा खाताना व तंबाखुजन्य पदार्थ चघळत असल्याचे दिसत असल्याने कायद्याचे रक्षण करणा-यांकडुनच कायद्याची पायमल्ली होत असल्याचे चिञ शहर व तालुक्यात पहावयास मिळत आहे. त्यामूळे ही शासनाची बंदी कोणासाठी याबाबत संभ्रम आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या