विद्याधामच्या संकर्ष शेळकेस बुद्धिबळात सुवर्णपदक

शिरुर,ता.१९ नोव्हेंबर २०१७ (संदीप घावटे) : शिरुर येथील विद्याधाम प्रशालेतील संकर्ष गंगाधर शेळके याने बुद्धीबळ स्पर्धेत प्रथम क्रमांकास सुवर्णपदक पटकाविले .

संकर्ष याने तेलंगणा राज्यातील वरंगळ येथे  दि. १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या शालेय राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवताना १७ वर्ष वयोगटात महाराष्ट्र संघासाठी तसेच वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले. संकर्ष हा सध्या विद्याधाम प्रशाला शिरूर येथे इयत्ता ९वी मध्ये शिकत आहे .राष्ट्रीय स्पर्धेत दिल्ली, तेलंगणा, बंगाल, तामिळनाडू या चार संघांचा पराभव केला तर गुजरात व आंध्र प्रदेश या संघांशी बरोबरी साधून पाच गुण प्राप्त करून सुवर्ण पदक मिळवले. या स्पर्धत भारतातून २६ राज्य संघांचे १३० खेळाडू सहभागी झाले होते.यापूर्वी देखील त्याने राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्नं आहे. खुद्द विश्वनाथ आनंद यांनी त्याच्या खेळाचे कौतुक केले होते. यासाठी त्याला वडील गंगाधर शेळके, क्रीडाशिक्षक संजय शेळके, दिपक गुजर, पुण्याचे प्रशिक्षक जयंत गोखले यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल मुख्याध्यापक डी.एन. खरमाटे, सचिव तु.म. परदेशी, शाळा समिती अध्यक्ष चंद्रकांत बाफणा, संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा यांनी संकर्षचे अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या