शिवशाहीर डॉ. तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथांना सायकल वाटप

शिरूर, ता. 20 डिसेंबर 2017 (तेजस फडके): संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताबाहेर शिवायणाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी म्हाराजांचे विचार घेऊन जाणारे आंतरराष्ट्रीय शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांचा 45वा वाढदिवस 25 डिसेंबर 17 रोजी राहुरी शहरात (जि. नगर) मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येणार आहे.

राहुरी येथील पांडुरंग लॉन्स येथे सकाळी 10 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी 14 दिव्यांगाना 3 चाकी सायकल, 100 अनाथ मुलांना ब्लॅकेंट्स, 100 अनाथ मुलांना मान्यवरांच्या हस्ते लेटरबुक वितरण करण्यात येणार आहे. या वेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. नामदेवराव जाधव उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संयोजकांनी दिली.

या कार्यक्रमासाठी राष्टसंत डॉ. भैय्युजी महाराज, खासदार उदयनराजे भोसले, आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, माजी आमदार अनिल भैय्या राठोड, आ. अरुणकाका जगताप, बद्रीनाथ महाराज तनपुरे, सुमंतबापू हंबीर, अरुणगिरी महाराज, डॉ. नानजीभाई ठक्कर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, सुरेशराव कोते, शालिनीताई विखे, उषाताई तनपुरे, राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, प्रणय सावंत तसेच टायगर ग्रुप महाराष्ट्रचे अध्यक्ष तानाजी जाधव, सचिन  गवळी व योगेश मालखरे, साखरखेर्डा ता सिंदखेडराजा जिल्हा बुलडाणा येथील पैनगंगा सहकारी सूतगिरणीचे कार्यकारी संचालक बी. एन. लोढे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट नेट सदस्य डॉ. बाळासाहेब गावंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

कार्यक्रमासाठी पांडुरंग लॉन्सचे संचालक मिलिंद शेटे यांनी या कार्यक्रमासाठी लॉन्स मोफत उपलब्ध करून  दिले तर वळण येथील राजूभाऊ शेटे यांनी येणाऱ्या दिव्यांगांसाठी स्नेहभोजनाची जबाबदारी  उचलली  आहे. तीन चाकी सायकली व इतर साहित्य शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांच्यावर प्रेम करणार्या त्यांच्या  चाहत्यांनी स्वयंस्पुर्तीने दिल्या आहेत. प्रा. नितीन बानुगडे पाटील हे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत. महाराष्ट्रात प्रथमच अशी घटना होत आहे की, एका दिव्यांगाच्या जन्मदिवसाला दिव्यांग लोकांना साहित्य वाटप करुन हा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. समाजामध्ये हा एक नवीन आदर्श घालून देण्याचे काम या वाढदिवसाच्या निमित्ताने होणार आहे. या सोहळ्यास नागरीक, शिवभक्तानी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन शिवाश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या