'शिरूर सेतू' म्हणजे पालकांच्या खिशावर दरोडा...

शिरूर, ता. 25 डिसेंबर 2017 (संपत कारकूड) (भाग-2): 'शिरूर सेतू' म्हणजे पालकांचा खिसा खाली होण्यासाठी अगदी सोईने आणि पध्दतशीर उभा केलेला 'महासेतू' अशी स्थिती दिसत आहे.

दाखल्यासाठी कागदांची जुळवाजुळव करुन या ठिकाणी आलेल्या पालकांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत विविध ठिकाणी उभ्या असलेल्या तथाकथीत लिखानवळ करणाऱया लेखकांपासून पालकांचे खरे शोषण चालू होते. जशी विविध डॉक्टरांची इंजेक्शन सेवेची वेगवेगळी 'फी' असते तशी येथे लिहिणारांची आहे. कागदे रंगविण्याच्या नावाखाली येथे दोन शब्द कागदांवर उतरविण्यासाठी मागेल तितके दाम मोजावे लागतात. साध्या कागदांवरील सामान्य प्रतिज्ञापत्राला येथे 100 ते 150 रुपये लिखानवळ फी मोजावी लागते.

पैसे देवून लिहून घेतलेले कागद आपण 'सेतू'मध्ये रांगेमध्ये तटस्थ उभे राहुन दिल्यानंतर 'सेतू'चे बिगर पावतीचे टोकन (35 रुपये) 'सेतू'ला द्यावे लागतात. खर्चाची पावती मात्र मागीतल्याशिवाय मिळत नाही. बहुसंख्य नागरिक आपले काम झाल्याची मेहरबानी माणून पावतीवर पाणी सोडतात. 'सेतू' चालविताना पैसे किती घेतले जातात? पैसे स्विकारल्यानंतर नागरिकांना पावती देतात का? इत्यादी महत्वाच्या कामकाजावर तहसिलदार यांचे कोठेही नियंत्रण दिसून येत नाही. करोडो रुपये खर्च करुन बांधलेल्या इमारतीत बसण्यासाठी खुर्च्यांची मोडतोड झालेली आहे. अगदी फरशीवर बसकन मांडून जेष्ठ नागरिकांना विसावा घेण्याची वेळ येथे येत आहे.


'सेतू'मध्ये 'सेवाधर्म' पार पाडणारे कर्मचारी प्रत्येक कामाचा किती 'मेवा' मिळतो याकडेच त्यांचे अधिक लक्ष असते. 'शिरूर येथील सेतू' असून गैरसोय व नसून खोळंबा अशी अवस्था आहे. नागरिकांनाही जणू आता हे नित्याचेच असल्याचे भासत आहे. तालुक्यातील नागरिकांचे असे शोषण होत असताना सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी वर्गांने लक्ष देणे आवश्यक आहे. सामाजिक सेवक अक्रमक झाले तरी काही दिवस दिखावू बदल करुन पुन्हा तोच-तोच प्रकार होत असल्याचे निर्देषणास येत आहे. 'शिरूर सेतू' नव्हे तर शिरूर 'केतू' म्हणण्याची वेळ येथे येणाऱया नागरिकांवर आली आहे.
(क्रमषः)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या