शिरूरमधील गुन्हेगारीबाबत चौकीवर काढला मोर्चा (Video)

शिरूर, ता. 29 डिसेंबर 2017 (प्रतिनीधी): शिरुर शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, वाढलेली गुन्हेगारी व महिलांची छेडछाड संदर्भात आज (शुक्रवार) शिरुर शहरातील नागरिकांनी हल्लाबोलच्या घोषणा देतानाच तातडीच्या उपायपयोजना कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले.

शिरुर शहरात गेल्या काही दिवसांत वाढलेली गुन्हेगारी, महिलांची छेडछाडीची प्रकरणे, घरफोड्या, रस्त्यांमध्ये वेगवेगळ्या बहाण्यांने लुटमार करणे, रस्त्याने जाणा-या दुचाकी चालकांकडून कर्णकर्कश्श आवाज व होणारा ञास, शाळा व कॉलेज परिसरात मुलींची छेडछाड आदी घटनांमध्ये गेल्या काही महिन्यांत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांवर नियंञण ठेवण्यास शिरुर पोलिस स्टेशनला अपयश आले असून, कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे या गोष्टींकडे शिरुर पोलिस स्टेशनचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेवा मंदिरापासून घोषणा देत मोर्चेकरांनी शिरुर पोलिस स्टेशन पर्यंत मोर्चा नेला. यावेळी हल्लाबोलच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. तर सर्वपक्षीय कार्यकर्ते व शहरातील सर्वसामान्य नागरिक ही यात सहभागी झाले होते. शहरात ढासळलेली कायदा-सुव्यवस्था सुधारणेसाठी दबंग अधिका-याची मागणी या मोर्चेकरांनी केली. पोलिस उपनिरीक्षक बी.बी. पाटील यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रविंद्र धनक, माजी नगराध्यक्ष नसीम खान, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, नगरसेवक मंगेश खांडरे, रिक्षा पंचायतीचे अनिल बांडे, भाजपचे शहराध्यक्ष केशव लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, यशस्विनीच्या वैशाली गायकवाड, मनसेच्या महिला आघाडीच्या डॉ. वैशाली साखरे, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा डॉ.पल्लवी शहा, महिला दक्षता समितीच्या शोभना पाचंगे, यशस्विनीच्या नम्रता गवारे, शशिकला काळे, अनघा पाठक, तारुअक्का पठारे, मंजुश्री थोरात, आश्विनी पोटावळे, परविन शेख, विजय नरके, प्रविन मुथ्था, खुशाल गाडे, वाहेद शेख, रामभाउ इंगळे, मोहम्मद हुसेन पटेल, संजय बांडे, युनुस सय्यद, मुस्ताक शेख, प्रमोद गायकवाड, नवनाथ जाधव, सुभाष जैन, दिपक घारु, सारिका विरशैव, कल्याणी गुळादे आदींसह शेकडो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात दामिनी पथक व फिरते गस्ती पथक वाढवण्यात यावे. शांतता कमिटी पुनर्जिवित करावी. दुचाकी नंबरप्लेट बदलने, सायलेंसरचा आवाज, टोळक्याने उभे राहणे याबाबत गांभिर्याने कारवाई करावी. शिरुर बसस्थानकाजवळील पोलिस चौकी चालू करावी, शिरुर शहरालगत पलिकडे कुरुंदच्या भागात अनेक मुली शाळेत जात असल्याने त्या भागात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी निवेदनकर्त्यांनी केली. या वेळी आंदोलनकर्त्यांपैकी काही महिलांनी या पुर्वीचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या काळात शिरुर शहरात गुन्हेगारांवर वचक ठेवला होता असे मत व्यक्त केले. अनेक महिलांनी रोड-रोमिओ, छेडछाड, चो-या, विनयभंग, आदी तक्रारींचा पाढाच पोलिसांसमोर वाचून दाखविला. या परिस्थितीत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी उपस्थित महिलांनी दिला. शिरुर पोलिस स्टेशनला प्रथमच महिलांचा रुद्रावतार पाहावयास मिळाला.
टोळक्यांवर कडक कारवाई करणार
शिरूर शहरात दामिनी पथक कार्यरत असून, शाळा कॉलेजमध्ये प्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. माझा वैयक्तिक नंबर सर्वांना दिला असल्याचे सांगत मुली व महिलांना काही तक्रार असल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहन करत अशा टोळक्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक भिमगोंडा पाटील व के. आर. घोंगडे यांनी मोर्चेकरांना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या