वढू बुद्रुक येथील सात जणांना अटक; पोलिस कोठडी

शिरूर, ता. 31 डिसेंबर 2017: येथील गोपाळ गोवींद्र महार यांच्या समाधीवरील छत व त्याकडे जाणाऱ्या बोर्डाची नासधूस करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना शनिवारी (ता. 30) अटक केली असून, त्यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. विशेष न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी 1 जानेवारीपर्यंत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
वढू बुद्रुक, ता. 30 डिसेंबर 2017 (शेरखान शेख): येथील गोपाळ गोवींद्र महार यांच्या समाधीवरील छत व त्याकडे जाणाऱ्या बोर्डाची नासधूस करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी गावच्या सरपंचांसह ४९ जणांवर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी स्वत: गावात येवून या प्रकरणी हस्तक्षेप केल्याने दोन समाजात होवू घातलेला संभाव्य संघर्ष टळला.

वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. 29) सकाळी दहाच्या सुमारास येत्या १ तारखेच्या पेरणे येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाच्या पाश्वभूमिवर एक सामाजिक शांततेची बैठक शिक्रापूर पोलिसांनी बोलाविली होती. या बैठकीपूर्वी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास गावातील काही युवकांनी गोपाळ गोवींद महार यांच्या समाधीस्थळाकडे जाणारा फलक काढून टाकत समाधीवर असलेले छताची तोडून नासधूस  केली. घडलेल्या घटनेच्या पाश्वभूमिवर शिक्रापूर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक सुवेझ हक हे दुपारी तीनच्या सुमारास गावात दाखल झाले. याच दरम्यान दंगल नियंत्रण पथकासह जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, शिरुर व रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस पथकही दाखल झाले. यावेळी श्री. हक यांनी दोन्ही गटांशी स्वतंत्र चर्चा केली. यावेळी मागासवर्गीय संघटनेचे प्रतिनिधींशी स्वतंत्र बैठक घेवून या प्रकरणी दोषींवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्याची ग्वाही दिली व या प्रकरणाची पुढील बैठक ४ जानेवारी रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी या बैठकीला रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन सेना, दलीत कोब्रा, रिपब्लिकन युवा मोर्चा आदी संघटनांचे प्रशांत पगारे, अशोक शेलवंत, सर्जेराव वाघमारे, निलेश आल्हाट, भाऊसाहेब भालेराव, किरण आल्हाट, राजेंद्र गायकवाड, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, अजय शिंदे, संजय देखणे आदी पदाधिकारी तसेच स्थानिक पांडूरंग गायकवाड, संदीप गायकवाड, आदी उपस्थित होते.

या घटनेनंतर सुषमा सुभाष ओव्हाळ (रा. वढु बुद्रुक, ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. सरपंच रेखा शिवले, उपसरपंच संजय शिवले, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, माजी सरपंच अंकुश शिवले, स्मृती समिती अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, माजी उपसरपंच संतोष शिवले, प्रमिला आरगडे, गणेश शिवले, विकास देशमुख, सोमनाथ शिवले, संभाजी भंडारे, राहुल भंडारे, उमेश भंडारे, आनुप कोठावळे, कृष्णा आरगडे, जालिंदर आरगडे, शरद दाभाडे, रवी शिवले, योगेश आरगडे, जालिंदर आरगडे यांसह एकूण ४९ जणांवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.

पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी सांगितले की, वढुची घटना निंदनीय असून, अशा घटनांमध्ये दोषी आढणारांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हा पोलिस सक्षम आहे. याबाबत येत्या चार तारखेला पुन्हा बैठक घेवून या प्रकरणाचा आढावा घेवून पुढील कार्यवाही केली जाईल. बैठकीसाठी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागिय पोलिस अधिकारी गणेश मोरे, प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार रणजित भोसले, पोलिस निरिक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या