शिरूर तालुक्यात बंदला समिश्र प्रतिसाद

शिरूर, ता. 4 जानेवारी 2018: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ विविध संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या "महाराष्ट्र बंद'ला पुणे जिल्ह्यासह शिरूर तालुक्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. मोर्चा, निषेध रॅली, रास्ता रोको, रेल रोको, निषेध सभा आदींच्या माध्यमातून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. जिल्ह्यासह अन्यत्र शांततेत "बंद' पाळण्यात आला.
शिक्रापूरमध्ये बाजारपेठ बंद पाडण्याचा प्रयत्न
येथील दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात बाजारपेठ बंद राहीली तरी येथील करंजे मार्केटमध्ये काही व्यापा-यांनी बंदला विरोध करताच दोन गटात घोषणाबाजी झाली. पोलिस निरिक्षक रमेश गलांडेंसह पोलिस फाटा घटनस्थळी लगेच दाखल होताच मोठा संघर्ष टळला. दलित संघटनांच्या राज्यव्यापी बंदला आज शिक्रापूरात संमिश्र प्रतिसाद लाभला. दिवसभरात शिक्रापूर परिसरात शांतता राहीली. महामार्गावरील वाहतुक सुरळीत होती तर आजुबाजुंच्या गावांमध्येही बाजापेठ सुरळीत होती.

न्हावरा परिसारात मोर्चा....
आंधळगाव, चिंचणी, आंबळे, निर्वी येथील दलित संघटनांनी एकत्रित येऊन न्हावरे येथे मोर्चा काढला. त्यानंतर निषेध सभा झाली. आंदोलकांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली.

मांडवगण फराटा येथे मोर्चा

मांडवगण फराटा येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. गावातील पेट्रोल पंप, दवाखाने; तसेच औषध दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. गावातील सर्व व्यवहारही बंद होते. येथील एसटी बस स्थानक चौकामध्ये निषेध मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. या परिसरातील इनामगाव, तांदळी, बाभुळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, सादलगाव, वडगाव रासाई, शिरसगाव, पिंपळसुटी या गावांमध्येही निषेध मोर्चे काढून कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध करण्यात आला.

पुणे-नगर रस्त्यावर शुकशुकाट

पुणे-नगर रस्त्यावर बुधवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. दररोज वाहनांची गर्दी असलेल्या या रस्त्यावर तुरळक वाहने फिरताना दिसत होती. नेहमी रस्ता ओलांडणेही शक्‍य नसलेल्या या रस्त्यावर आज वाहने नसल्यामुळे शुकशुकाट जाणवत होता. दुपारी तीन वाजेपर्यंत तुरळक वाहने रस्त्याने ये-जा करीत होती. रांजणगाव गणपती, कोंढापुरी, कासारी फाटा, चोविसावा मैल आदी महत्त्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी वाहनांची गर्दी नव्हती.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या