कोरेगाव भीमाात मोडून पडलाय संसार तरी...(ग्राऊंड रिपोर्ट)

कोरेगाव भीमा, ता.७ जानेवारी २०१८ (सतीश केदारी) : कोरेगाव भीमा, सणसवाडी या भागात दंगलीनंतर अनेकांचे व्यावसाय उद्धवस्त झालेत तर काहींची संसार उघड्यावर आल्याचे चिञ आहे.
शिरुर तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणुन ओळखला जातो. या तालुक्यात कधीच मोठा अनुचित प्रकार आजतागयत घडलेला नाही. परंतु कोरेगाव भीमा येथे अचानक दंगल उसळली अन तालुक्याच्या या ओळखीला तडा गेला. कोरेगाव भीमा येथे सर्वात आधी दंगल घडल्यानंतर त्याचे लोण सणसवाडी गावात आले. या ठिकाणी जमावाने जाळपोळ केली. दगडफेक केली. याच ठिकाणी स्थानिक तरुणाला जमावाच्या मारहाणीत नाहक जीव गमवावा लागला. कोरेगाव भीमा, सणसवाडी येथे दंगल झाल्यानंतर www.shirurtaluka.com ने स्थानिकांच्या भावना जाणुन घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी तर या घटनेची आपबितीच कथन केली. कोरेगाव भिमा येथे दंगल सुरु झाल्यानंतर सुरुवातीला दगडफेक करण्यात आली. यानंतर जमाव अधिकच प्रक्षुब्ध होत गेला. जाळपोळ सुरु करण्यात आली त्याचबरोबर दिसेल ती गाडी फोडण्यात-जाळण्यात येत होती. यात त्याच दिवशी अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जमावाने या जाळपोळीत अनेक स्थानिकांची दुकानेही जाळण्यात आली.

या जाळपोळीत संपुर्ण नुकसान झालेल्या भांड्यांचा व्यावसाय करणारे प्रविन मुथा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी थरारक प्रसंगच वर्णन केला. कोरेगाव भीमा गावापासुन काही अंतरावर असणा-या स्टेट बॅंकेजवळ मुथा यांचे छोटेसे दुकान होते. दुकानास आग लागली त्यावेळेस मुथा हे कुटुंबियास घरात होते. परंतु बाहेर आगीची कल्पनाच नव्हती. कोणीतरी आग लागल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी बाहेर पाहिले असता आगीचे प्रचंड लोट दिसुन येत होते. घरात पत्नी अन २५-२७ वयाची मतिमंद मुलगीही होते.यांना बाहेर निघता येतच नव्हते. तितक्यात आत अडकून पडलेल्या या कुटुंबाने मदतीची याचना केल्यानंतर स्थानिकांनी शिडीच्या साहाय्याने बाहेर काढले. मतिमंद मुलीला अक्षरश: फरफटत बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला. माञ, त्यांच्या संपुर्ण व्यावसायासह संसाराची राख-रांगोळी झाली. अंगावर कपडे ही राहिली नसल्याचे सांगत मुथा यांनी आपल्या भावना मांडल्या. जयेश शिंदे यांनी बोलताना सांगितले कि, अत्यंत गरीबीत माझा व्यावसाय उभा केला होता. सर्वकाही चांगले चालले असताना अचानक झालेल्या दंगलीत संपुर्ण व्यावसायाचीच राख झाली आहे.

त्याचप्रमाणे सणसवाडीत देखिल अनेक व्यावसायिकांच्या भावना जाणुन घेतल्या असता  वडापाव विक्रेत्यांपासुन भंगारविक्री करणा-या व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यात परप्रांतिय असणारे व्यावसायिकही सुटले नाहीत.अनेकांनी पै-पै जमा करुन संसार, व्यावसाय उभा केला होता. माञ यात स्वप्नांचीच राख-रांगोळी झाली आहे. तर काहींनी उसने, व्याजाने घेतलेले पैसेही गुंतवले होते. परंतु सर्वच मातीमोल झाली असल्याचे सांगितले. काहींनी संसार उघड्यावर आला असल्याचे सांगत पुन्हा उभारी घेऊ असे म्हणत भावना व्यक्त केल्या आहेत.
(क्रमश:)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या