शिक्रापूरजवळ अपघातात सासरा, सून जागीच ठार

शिक्रापूर, ता. 5 फेब्रुवारी 2018: कासारी फाटा (ता. शिरूर) येथे चोविसावा मैलाजवळ दुचाकीला मोटारीने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी घडली.


दत्तात्रेय सोनबा भुजबळ (वय 52) व मोहिनी अतुल भुजबळ (वय 24, दोघे. रा. टेल्को कॉलनी, आंबेगाव बुद्रुक पुणे 46, मूळगाव टाकळसिंग, ता. आष्टी, जि. बीड) हे सासरा व सून असे मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. राजू सोनबा भुजबळ (रा. सणसवाडी, जि. बीड) यांनी शिक्रापूर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली.

दत्तात्रेय भुजबळ हे सूनेसह दुचाकीवरून (एमएच 12 के एक्‍स 763) पुण्याहून बीडला चालले होते. चोविसावा मैलावर पुणे-नगर रस्त्याच्या कडेला ते दुचाकी उभी करून एका हॉटेलजवळ थांबले होते. चहापाणी घेऊन ते पुन्हा त्यांच्या दुचाकीवर बसत असताना पुण्याहून नगरकडे येणाऱ्या मोटारीने (एमएच 14 सी एक्‍स 7142) दुचाकीला जोरारदार धडक दिली व त्यानंतर ती मोटार समोरच्या झाडावर जाऊन आदळली. डोक्‍याला जबर मार लागल्याने वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. मोटारमधील दोघेजण फरार झाले असून, याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या