पाबळमध्ये युवकाच्या आत्महत्याप्रकरणी अचानक बंद

पाबळ, ता. 20 फेब्रुवारी 2018: येथील नवनाथ बबन वरखडे याला पोलिस नाईक प्रल्हाद सातपुते यांनी मारहाण केली म्हणूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत पाबळ ग्रामस्थांनी सोमवारी (ता. 19) अचानक बंद पाळत लोणी रस्त्यावर टायर जाळले. अचानक घडलेल्या या प्रकाराने शिक्रापूर पोलिसांची पळापळ झाली. शिवाय, सोशल मिडियावर या विषयी अनेकजण चर्चा करत होते.

नवनाथ वरखडे व दत्तू शिनलकर यांचे आर्थिक कारणावरून आठ दिवसांपूर्वी वाद झाला होता. याबाबतची तक्रार शिनलकर यांनी पाबळ पोलिस चौकीवर दाखल करताच नवनाथ वरखडे व त्याचा साथीदार याला पोलिस नाईक प्रल्हाद सातपुते यांनी मारहाण केल्यानेच नवनाथ वरखडे याने शनिवारी (ता. 17) विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा गावात झाली. या घटनेत त्याला पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान रविवारी (ता. 18) मृत्यू झाला. प्रल्हाद सातपुते व दत्तू शिनलकर यांचे संगनमत होऊन नवनाथ वरखडे याने आत्महत्या केल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी गावात बंद पाळत रस्त्यावर टायर जाळायला सुरवात केली.

खेड-शिरूर रस्त्यावर व एसटी स्थानक परिसरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण होण्याची स्थिती असतानाच पोलिस निरीक्षक रमेश गलांडे दंगलविरोधी पथकासह पाबळमध्ये दाखल झाले. एकूणच आक्रमक झालेले ग्रामस्थ व दोषींबाबत तातडीने कारवाई करण्याची ग्वाही पोलिसांकडून देण्यात आल्याने प्रक्षुब्ध जमाव शांत झाला. या वेळी पोलिस निरीक्षक रमेश गलांडे उपस्थित होते.

दरम्यान, या घटनेत स्थानिक दत्तू शिनलकर यांच्या सांगण्यावरूनच ही मारहाण झाल्याचा आरोप वरखडे यांच्या कुटुंबीयांनी लेखी स्वरूपात पोलिसांकडे केला असून, या संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमून दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी पाबळमध्ये येऊन दिली. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या