शिक्रापूर दरोडाप्रकरणी गुन्हेशाखेकडून चार आरोपी अटकेत

शिक्रापूर, ता. २४ फेब्रुवारी २०१८ (प्रतिनीधी) : येथील हमिराणी मेटल कंपनीतील दरोडा प्रकरणीचार आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे.


शिक्रापूर,(ता.शिरूर)येथील बजरंगवाडी येथे हमीराणी मेटल प्रा. लि. या कंपनीतील तांब्याचे धातूचे जॉब बनविणाच्या कंपनीत १० ते १५ अनोळखी चोरट्यांनी कंपनीच्या सुरक्षारक्षकास हाताने मारहाण करून पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवून आरोपींनी आणलेल्या निळ्या रंगाच्या टेम्पो व पांढऱ्या रंगाचे पिकअप जीप मधून जबरदस्तीने सुमारे तेवीस लाख एकोणीस हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या रॉडपट्टी, सिंगल तारा, तांब्याच्या पट्टीने भरून ठेवलेल्या १९० बॅग असा एकूण ७६०० किलो वजनाचा माल जबरीने चोरून नेला होता.

त्याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यामुळे अज्ञात आरोपीं विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.सदर गुन्ह्यात पिस्तुल वापरून कंपनीवर दरोडा टाकल्याने व गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हयाचा समांतर तपास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस नाईक पोपट गायकवाड, राजू मोमीन, महेश गायकवाड, निलेश कदम, नितीन गायकवाड, रवि शिनगारे, रौफ इनामदार, चालक नवले यांचे पथकाने माहीती काढणेस सुरुवात केली.

त्यांनतर सदर चोरीचे घटनेचे व आजूबाजूचे परिसरातील सीसी टीव्ही फुटेज संकलीत करून गुन्हयात वापरलेली वाहने निष्पन्न केली. सदर दरोडयाचे गुन्ह्याचा तपास करीत असताना गुन्ह्यातील आरोपी असेंट कारमधून चाकण शिक्रापूर रोडला बहुळ येथे येणार असल्याची माहीती एका खबऱ्यामार्फत गुन्हे शाखेचे पथकास मिळाली. त्यावरून सदर पथकाने साध्या वेशात सापळा रचून दिपक रामभाऊ पानसरे(वय ३४ वर्षे), वामन पोपट पानसरे(वय ४८ वर्षे) सतीश विश्वनाथ साबळे(वय ३५ वर्षे) सर्व रा.बहुळ ता. खेड, जि. पुणे तसेच पवन सोपान वाडेकर, वय ३० वर्षे, रा. तळवडे रोड, त्रिवेणी नगर, ता. हवेली यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

त्यांचे ताब्यात मिळालेली असेंट कार नं एम एच १४ जीडी ३०९१ ही गाडी त्यांनी दरोडयाचे गुन्ह्यात वापरलेने जप्त करण्यात आली आहे. तसेच तपासात आरोपींनी गुन्ह्यात चोरलेला तांब्याचे धातूच्या वस्तूपैकी तेरा लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून  सदर आरोपींकडून अशा प्रकारचे आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर व पोपट गायकवाड यांनी सांगितले आहे. सदर आरोपींना  शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या