गरमागरम पिठलं-भाकरी अन् मिरचीचा ठेचा...

शिरूर, ता. २५ फेब्रुवारी २०१८ (सतीश केदारी) : गरमागरम पिठलं भाकरी अन मिरचीचा ठेचा यामुळे शिरुर शहरातील झुणका भाकरी केंद्र शिरुरकरांच्या पसंतीस उतरले असून सर्वसामान्यांची या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी होत आहे.


शिरुर कृषी उत्पन्न बाजार समिती व क्रांती महिला बचत गट, कारेगाव यांच्या संयुक्त प्रयत्नांतुन गेल्या महिनाभरापासुन शिरुर कृषी उत्पन्न बाजासमितीच्या आवारात हे झुणका  भाकर केंद्र चालविले जात आहे.या झुणका  भाकर केंद्रावर दिवसभरात केव्हांही फेरफटका मारल्यास गरमागरम बाजरीची भाकरी मिळतेच परंतु दोन भाज्या मिळतात. या भाज्यांमध्ये चविष्ट पिठलं अन अन एक पातळ भाजी दिली जाते. सोबत मिरचीचा ठेचा खावयास मिळत आहे.हे सर्व अगदी माफक दरात मिळत असल्याने शेतकरी, ग्राहक व शिरुर शहरातील नागरिक याठिकाणी दिवसभर गर्दी करत आहेत.

शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीने राबविलेला हा आगळा वेगळा उपक्रम पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव बाजारसमितीत राबविणारी ही पहिलीच संस्था आहे. याबाबत शिरुर बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी शेतक-यांसाठी व शिरुरकरांसाठी बाजारसमितीतच चांगले दर्जेदार व माफक दरात जेवण मिळावे या उद्देशाने व संचालक मंडळाच्या निर्णयातून अभिनव प्रयोग राबविला असल्याचे सांगितले. हे झुणका  भाकर केंद्र चालविणा-या बचत गटातील संचालिकांनी दिवसभरातुन बाजारसमितीतीलच नव्हे तर शिरुर शहरातील नागरिक जेवणासाठी येत असल्याचे सांगत या माध्यमातुन चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे यांनी सांगितले कि, बाजारसमितीच्या या नाविन्यपुर्ण उपक्रमाची प्रशंसा अनेकांनी केली असुन यापुढे बाजार समिती शेतक-यांच्या हिताचाच विचार करेल असे सांगितले. शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीने राबविलेल्या झुणका  भाकर केंद्राची तालुक्यातील शेतक-यांसह शिरुर शहरातील नागरिकांनी कौतुक केले असून, हे झुणका भाकर केंद्र शिरुर शहरात प्रचंड लोकप्रिय होउ लागले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या