शिरसगाव काटा येथे वृद्ध महिलेसह एकाचा खून

Image may contain: 2 people, closeup

शिरसगाव काटा
, ता. 26 फेब्रुवारी 2018:
येथे एक वृद्ध महिला व पुरुषाचा खून झाल्याची घटना रविवारी (ता. 25) रोजी उघडकिस आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या घटनेत वत्सलाबाई पोपट माने (वय ६३ वर्ष) व किसन शिलेमान लोंढे (वय ६०) दोघेही रा. शिरसगाव काटा) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वत्सला पोपट माने यांच्या घरी किसन सुलेमान लोंढे हे शेळ्या राखण्याचे व इतर कामे करत होते. गेल्या दोन दिवसांपासून घराला कुलुप लावले असून घराच्या बाहेरील आवारात जनावरे बांधलेली होती. दररोज नित्यनेमाने जनावरांना चारा-पाणी करताना कोणी न दिसल्याने शेजारील व्यक्तींना शंका येऊन कुलुप लावलेल्या घराला खिडकीतून डोकावले असता, वास आल्याने आतमध्ये पाहिले. यावेळी दोघांचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चाकूसारख्या धारदार हत्याराने भोसकून खून केलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर सदरील व्यक्तीने वृद्ध महिलेचा मुलगा भानुदास पोपट माने (रा.कोयाळी, ता. खेड जि. पुणे मूळ-शिरसगाव काटा) याला कळविले. यानंतर भानुदास याने पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर शिरुर पोलिसांना सदर घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाहिले असता इंदिरानगर येथील राहत्या घराला बाहेरुन कडी-कुलुप लावलेले दिसले. तसेच आतमध्ये दोघेही मृतावस्थेत आढळून आले.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी घटनास्थळाचा पंचानामा करुन आज (सोमवार) दोन्हीही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शिरुर येथे पाठवले. तसेच याबाबत वृद्ध महिलेचा मुलगा भानुदास पोपट माने याने शिरुर पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे हे करत असून, शिरुर पोलिसांनी घटनेचे गांभिर्य ओळखून तपास सुरु केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या