काळजाचे तुकडे तुला शिवता येतात का बघ...

पारनेर, ता.२ मार्च २०१८ (तेजस फडके) : जन्मलेली तुझी मुलगी मारून बघ...काळजाचे होणारे तुकडे तुला शिवता येतात का बघ अशा काळीज चिरणा-या रचनांनी बेधडक महाराष्ट्रचा कार्यक्रम चांगलाच रंगुन गेला.

गारखिंडी,कान्हूर पठार अन पिंपळगाव तुर्क या तीन गावाच्या धडाकेबाज कवींनी बेधडक महाराष्ट्र या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे टाकळी ढोकेश्वर चे प्राचार्य श्रीधर जाधव व डॉ. भाऊसाहेब खिलारी यांच्या हस्ते झाले. आपल्या मातीतल्या साहित्यिकांचा कार्यक्रम घेण्यात मराठी विभागाचे प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे सरांनी मोठा पुढाकार घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत खुमासदार अन हास्याचे कारंजे उडवत गारखिंडीचे कवी देवा झिंजाड यांनी केली. 'बाळा मला भूक नाही असं आई जव्हा म्हणायची..आमच्या टोपल्यात तव्हा अर्धीच भाकर असायची" ह्या देवा झिंजाड ह्यांच्या काळीजस्पर्शी ओळींनी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणले.तसेच,"माय बापाचं हे गाणं मोठ्या मायेनं म्हणावं...जुन्या खोडाचं दुखणं हिरव्या पानाला कळावं" ह्या दुसऱ्या कवितेच्या ओळींनी तर रसिकांच्या ह्रदयाचा ठावच घेतला.हलक्या फुलक्या मार्मिक विनोदातून त्यांनी समाजप्रबोधनसुद्धा केले. स्त्री भ्रूण हत्त्या, हुंडा बळी ह्याविषयीसुद्धा उत्तम कविता सादर केल्या.

कान्हूर पठारच्या अनेक पुरस्कार प्राप्त कवयित्री स्वाती ठुबे यांनी दुष्काळी सावट व स्त्री भ्रूणहत्या या विषयांना सामाजिक विषयाला हात घालत आपल्या शब्दांनी वातावरणाला विचार करायला भाग पाडले." भिरभिरती नजर काळया रानात फिरते
पोटी वणवा पेटतो भूक जळून मरते" म्हणत दुष्काळाचे सावट तर जन्मलेली तुझी मुलगी मारून बघ, काळजाचे होणारे तुकडे तुला शिवता येतात का बघ" अशा अप्रतिम रचना सादर केल्या.

पिंपळगाव तुर्कचे कवी अरुण वाळुंज यांनी " प्रेम कराव हिरोसारखं बेधुंदपणे नाचून" ही रचना सादर करत हास्याची लहर पसरवून दिली व" माफ करा राजे, आम्ही विसरलो तुम्हाला तुमच्याच राज्यात आज कोण विचारतो कुणाला? म्हणत शाब्दिक प्रहार केले. " राजे तुमच्या विचारांचे तेज आता पुन्हा पेटवावे लागेल, अन झोपलेल्या रयतेला राजे पुन्हा उठवाव लागेल म्हणत " तरुणाईच्या काळजाला साद घातली.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधर जाधव, मराठी विभागाचे प्रा.लक्षणराव कोठावळे, प्रा.अशोक मोरे, प्रा.शांता गडगे, प्रा.शांताराम साळवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमास नवनाथ वाळुंज, अमोल गवळी, एकनाथ वाळुंज , राहुल वाळुंज यांची या उपक्रमाला मोलाची साथ मिळाली.बेधडक महाराष्ट्र रमेश रोहकले, देवा झिंजाड, सुमित यांच्यासारख्या साहित्यिकांना व युवा कवींना सोबत घेऊन अनेक कार्यक्रम घेण्याचा मानस बेधडक महाराष्ट्र चे अध्यक्ष अरुण वाळुंज यांनी व्यक्त केला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या