सोशल मिडियाच्या बदलांना सामोरे जा: प्रा. धुमाळ

पुणे, ता. ५ मार्च २०१८(प्रतिनीधी) : सोशल मिडिया हे नव्या युगाचे माध्यम असुन सोशल मिडियाची भाषा व आगामी काळात होणारे बदल हे स्विकारावेत व होणा-या बदलांना सामोरे जाण्याचे आवाहन मातोश्री प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष व पञकार प्रा.सतीश धुमाळ यांनी केले.

पुणे येथे विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सरस्वती नाईट कॉलेज ऑफ आर्टस ॲन्ड कॉमर्स च्या वतीने  कवी केशवसुत राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी 'कविता आणि सोशल मिडिया' या विषयावर धुमाळ यांचे व्याख्यान झाले. 

ते पुढे बोलताना म्हणाले की आजची तरुणाई ही कवितेच्या माध्यमातुन सोशल मिडियावर विविध विषयांवर व्यक्त होत आहे.त्यातुन चांगल्या प्रकारची काव्यनिर्मिती होताना पहावयास मिळत असुन कवितेद्वारे कवीचे विचार, व्यक्तिमत्व, त्याच्या आवडी-निवडी, व भाव-भावना विचारांचे प्रगटीकरण होत असते. सोशल मिडियाचा सध्या मोठ्या वेगाने प्रसार होत आहे.

या सोशलमिडियाला चुकीचे न समजता त्याचा प्रभावीपणे वापर करीत आपले साहित्य सर्वदूर पोहचवावे. सोशल मिडियावर अनेक लोक व्यक्त होत असुन मोठ्या प्रमाणावर विविध विषयांवर लिहित आहेत वाचत आहे. नवी पिढी मोठ्या प्रमाणावर या सोशल मिडियाचा वापर करित आहे.यावेळी प्रा.धुमाळ यांनी काव्य म्हणजे काय हे स्पष्ट करीत काव्याचे विविध प्रकार उपस्थितांसमोर विषद केले.यावेळी कवी केशवसुत यांच्या नात व प्रसिद्ध लेखिका कुंदा प्रधान (दामले) यांनी केशवसुत व त्यांच्या साहित्याविषयीची माहिती सांगितली.

यावेळी प्राचार्य डॉ पी एन शेंडे यांच्या हस्ते लेखिका कुंदा प्रधान दामले व सतीश धुमाळ यांच्या सत्कार करण्यात आला.स्वागत प्रा श्याम कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन प्रा.श्रीराम देशमुख यांनी केले.या प्रसंगी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी विनायक देशपांडे व विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.परिचय प्रा.विनय बोडस यांनी करुन दिला आभार सिध्दी बोकील यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या