रामलिंग येथे शिक्षकांनी घेतले 'स्पोकन इंग्लिश' प्रशिक्षण

Image may contain: 23 people, people smiling, people standingअण्णापूर, ता. 8 मार्च 2018 (ज्ञानेश पवार): इंग्रजी ही जागतिक ज्ञान भाषा असल्याने व उच्च शिक्षणाचे माध्यम हे इंग्रजी असल्यामुळे प्राथमिक स्तरापासून या विषयाचे अध्यापन होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, लोणी काळभोर व जिल्हा परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शिरुर तालूक्यातील इंग्रजी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी पाच दिवशीय 'स्पोकन इंग्लिश' प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन रामलिंग (ता.शिरूर) येथील सेंट जोसेफ इंग्लिश मेडीयम स्कूल येथे करण्यात आले होते.

सहभागी शिक्षकांना इंग्रजी भाषण व संभाषणाच्या विविध पद्धतीची माहिती खेळ व कृतींच्या माध्यमातून करुन देण्यात आली. प्रात्यक्षिकांवर जास्तीत जास्त भर असल्याने व आपल्या दैनंदिन जीवनातील विविध प्रसंगातून इंग्रजी बोलण्याचा सराव झाल्याने वर्गात शिकवणे अधिक सोपे व आनंददायी झाल्याचे मत अनेक शिक्षकांनी बोलून दाखवले. ब्रिटीश कौन्सिलचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक ज्ञानेश पवार व प्रदिप ढोकले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण समन्वयक म्हणून पंचायत समितीचे विषय तज्ञ संतोष गावडे यांनी काम पाहिले. शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, केंद्र प्रमुख लक्ष्मण काळे, रामदास बोरुडे, शिरुर तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभेचे अध्यक्ष शहाजी पवार, अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी वाळके यांनी प्रशिक्षणास भेट देवून शुभेच्छा दिल्या.

प्रशिक्षणाच्या समारोपाच्या वेळी शितल शेंडे, सुरेखा पवार, अशोक दहीफळे, नितिश पवार, सेंट जोसेफ विद्यालयाच्या प्राचार्या नॅन्सी मॅम यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक राजेंद्र चोरे तर आभार शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन संजय तळाले यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा परदेशी यांनी केले. प्रशिक्षणाचे नियोजन अनिल वाखारे, संतोष देवरे, विकास वाखारे, शितल थोरात, सोन्याबापू कर्पे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या