तळेगावात आठवडे बाजारामुळे होते वाहतूक कोंडी

Image may contain: one or more people and outdoor
तळेगाव ढमढेरे
, ता.१३ मार्च २०१८(प्रा.एन.बी.मुल्ला) :
तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजार तळेगाव ढमढेरे–न्हावरे या मुख्य रस्त्यावर भरत असल्याने बाजाराच्या दिवशी दर सोमवारी मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने प्रवासी व वाहतुकदारांना तास–तास भर ताटकळत थांबावे लागते.

तळेगाव ढमढेरे येथे बाजार तळ आहे परंतु ते कमी पडत असल्याने बरेचसे शेतकरी व व्यापारी आपला माल विकण्यासाठी रस्त्यावरच बसलेले असतात तसेच आठवडे बाजार दिवशी नदीपात्रा शेजारून असलेला पर्यायी रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवतेच.

तळेगाव ढमढेरे ही एक तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे.शिरूर कॄषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारही याठिकाणी असल्याने तालुक्यातील सर्वच गावांचा तळेगावशी संपर्क असतो.विशेषत: तालुक्यातील शेतकरी येथील बाजार समितीत धान्याच्या विक्रीसाठी तर व्यापारी व परीसरातील नागरीक धान्य खरेदीसाठी नेहमीच येत असतात.सुमारे 20 हजार लोकसंख्या असलेल्या या बाजारपेठेच्या गावात बाजार तळ आहे परंतु तो पुरेशा प्रमाणात नसल्याने आणि बाजारासाठी पुरेसे ओटे नसल्याने आठवडे बाजार तळेगाव ढमढेरे –न्हावरे रस्त्यावरच भरलेला असतो.

परीसरातील विठ्ठलवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पिंपरी सांडस, न्हावी सांडस, निमगाव म्हाळुंगी, कासारी, माळवाडी, घोलपवाडी, भिमाशेत, टाकळी भिमा, दहीवडी, पारोडी आदी गावातून लोक याठिकाणी आठवडे बाजारासाठी येत असल्याने शेतकरी, व्यापारी व परीसरातील नागरीकांच्या दॄष्टिने हा तालुक्यातील सर्वात मोठा आठवडे बाजार आहे.जिल्हयातील एक मोठा बकरी बाजारही याच ठिकाणी रस्त्यावर वेळ नदी पात्रालगत भरतो.बक-यांची वाहतुक करणा-या खाटीकांचे टेम्पो, ट्रक देखील रस्त्यावरच असतात.पुण्या–मुंबर्इहून आलेले खाटीक बकरी खरेदी करण्यात मग्न असतात.त्यांच्यामुळे झालेल्या वाहतुक कोंडीकडे मात्र त्यांचे लक्षच नसते.तसेच विक्रीसाठी आणलेली बकरीही सर्व रस्त्यावरच असतात.आठवडे बाजारा दिवशी मुख्य रस्त्याच्या कडेने वेळ नदी पात्राच्या शेजारून पर्यायी अरूंद रस्त्याने वाहतूक वळविलेली असते.तळेगाव न्हावरे या रस्त्याने अवजड मालवाहतुक व प्रवासी वाहतुक मोठया प्रमाणात होत असल्याने हा मार्ग नेहमीच वर्दळीचा असतो.त्यामुळे समोरासमोरून वाहने आल्यानंतर वाहतुकीची मोठया प्रमाणात कोंडी होते व किमान तासभर तरी एकाच ठिकाणी ताटकळत थांबावे लागते.पुढे गेल्यानंतर नदीवरील प्राचीन अरूंद दगडी पुलावर पुन्हा वाहतुकीची कोंडी होते.

या सर्व प्रकारामुळे वाहन चालक वैतागून जातात.परीसरातील नागरीकांची या आठवडे बाजारामुळे वाहतुकीची गैरसोय होत असल्याने स्थानिक प्रशासनाने नेहमीचा वर्दळीचा रस्ता मोकळा ठेवून बाजार भरविण्याचे योग्य प्रकारे नियोजन करावे अशी मागणी परीसरातील नागरीकांकडून होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या