कोंबड्यांवर हल्ला केला म्हणून कुत्र्यांना मारले विष घालून

file photo
शिरूर
, ता. 15 मार्च 2018:
कोंबड्यावर हल्ला करून जखमी केले म्हणून दोन पाळीव कुत्र्यांसह त्यांच्या दोन पिलांना भाकरीतून विष घालून मारल्याची घटना पाचर्णे मळा येथे घडली. या प्रकरणी शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार: तर्डोबाची वाडीजवळ पाचर्णे मळा आहे. येथे बाळू पाचर्णे व भागचंद पाचर्णे हे एकमेकांच्या शेजारी राहतात. दोन दिवसांपूर्वी भागचंद पाचर्णे यांच्या पाळीव कुत्र्याने बाळू पाचर्णे यांच्या कोंबड्यावर हल्ला केला. त्यात कोंबड्यांच्या पंखांना जखमा झाल्या. याबाबत बाळू यांनी भागचंद यांना विचारून करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. यानंतर भागचंद यांनी आपल्या शेतातील कामगार रतन मोरे याच्याकडे पाचशे रूपये देऊन ते बाळू यांना देण्यास सांगितले व जखमी कोंबड्याला घेऊन येण्यास सांगितले. मोरे हे पैसे घेऊन बाळू पाचर्णे यांच्याकडे गेले होते. परंतु, त्यांनी जखमी कोंबडा न दिल्याने मोरे याने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी त्या कुत्र्याला औषध घालून मारून टाकू, अशी धमकी बाळू पाचर्णे व त्यांची आई जनाबाई पाचर्णे यांनी दिली होती.

मोरे यांना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास कोंबड्यावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यासह आणखी एक कुत्रा व दोन पिले मृतावस्थेत आढळली. मोरे यांनी याबाबत पाचर्णे यांना कळविले. तेव्हा चारही कुत्र्यांच्या तोंडातून फेस येत होता. यावरून त्यांना खाण्यातून कुठलेतरी विषारी औषध दिल्याचा संशय आल्याने भागचंद पाचर्णे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारीवरून बाळू पाचर्णे व जनाबाई पाचर्णे यांच्याविरूद्ध पाळीव प्राण्याच्या मृत्युप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पोलिस हवालदार ए. ए. गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या