अबोलीची फुले आणि गजरे बनविण्यात तळेगांवच्या मुली दंग

तळेगाव ढमढेरे, ता. २६ मार्च २०१८ (प्रा.एन.बी.मुल्ला) : तळेगांव ढमढेरे येथील जि. प. प्राथमिक शाळा नंबर 2 मध्ये विविध फुले बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ट्युलिप ची फुले, लिलीची फुले त्याचप्रमाणे अबोलीची फुले व त्यापासून गाठीचे गजरे तयार करुन घेण्यात आले.

जि.प. प्राथमिक शाळा पाबळ च्या आदर्श शिक्षिका दीपाली पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत त्यांनी इयत्ता सहावीच्या मुलींना क्रेप पेपर, पताका कागद आदीच्या साहाय्याने फुले कशी  बनवायची तसेच उरलेले कागदाचे  तुकडे फेकून न देता त्याचा कोलाज कामांसाठी कसा उपयोग करायचा ते देखील सांगितले. मुलींच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आल्याचे वर्गशिक्षिका आशा सकट यांनी सांगितले.

वेळोवेळी विविध विषयांचे मार्गदर्शन सतत होत असल्याने आम्ही सर्व मुली दिवसेंदिवस विविध क्षमता प्राप्त करत चाललो आहोत असे मत वर्गांतील विद्यार्थीनी मांडले.  इयत्ता पाहिलीपासूनच विविध उपक्रम, स्पर्धा परीक्षेतील मार्गदर्शन व यश, गुणवत्तेचा उच्च दर्जा, शाळेचं बदललेलं रूप, विविध भौतिक सुविधा, सुसज्ज संगणक कक्ष आदी सुविधांमुळे शाळेचा पट देखील वाढत चालला आहे. पहिलीत शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांची आतापासूनच सुरुवात झाली आहे. मेंदू व मनाच्या विकासाबरोबरच जीवनात एखादं कौशल्य प्राप्त होणे आवश्यक आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या