कबड्डी खेळताना चक्कर येऊन विद्यार्थ्याचा मृत्यू (Vdo)

शिरुर, ता. १ एप्रिल २०१८(प्रतिनीधी) : पिंपळे जगताप (ता.शिरुर) येथिल जवाहर  नवोदय विद्यालयातील इयत्ता सातवीतील विद्यार्थी कबड्डी खेळत असताना चक्कर येवून पडला व त्यानंतर तो मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करित नातेवाईकांनी  मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याबाबतची माहिती पुढील प्रमाणे, शिरुर तालुक्यात पिंपळे जगताप येथे नवोदय विद्यालय आहे या विद्यालयात गौरव वेताळ (वय.१३,मूळ रा.न्हावरा ता.शिरुर) येथिल विद्यार्थी इयत्ता सातवीत शिकत आहे.

३१ मार्च रोजी विद्यालयात कबड्डीच्या  सामन्यात तो खेळत असताना अचानक चक्कर येवुन पडला व मृत झाला. दरम्यान घटनेनंतर गौरव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरुर येथे आणला असता नातेवाईकानी या घटनेबाबत संशय व्यक्त करुन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करित मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

दरम्यान बातमीदारां समवेत बोलताना नातेवाईक म्हणाले की, या घटनेबाबत प्राथमिक उपचार त्वरित झाले असते तर गौरव वाचला असता असे सांगुन जो पर्यत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मान्य होत नाही तो पर्यत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.

आज (दि.१ एप्रिल) रोजी शिरूर पोलिस स्टेशन मध्ये प्रांताधिकारी भाऊसाहेब गलांडे,तहसिलदार रणजित भोसले,शिक्रापुरचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे,पोलिस उपनिरीक्षक किरण धोंगडे, गौरव चे नातेवाईक परशुराम इसवे, निलेश वेताळ,  नवोदय विद्यालयाचे प्राचार्य टी एम नायर, भगवान शेळ्के,पंचायत समितीचे सदस्य आबासाहेब सरोदे यांच्यात बैठक झाली.प्रांताधिकारी गलांडे यांनी मध्यस्थी केल्यावर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईक राजी झाले.

दरम्यान शिरुर तालुका चर्मकार संघटनेचे तुषार वेताळ,रमेश इसवे,सोमनाथ इसवे,गोपीचंद कदम यांनी या घटनेची तातडीने चौकशीची मागणी केली.शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले की गौरव वेताळ मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास चालू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या