आदरणीय भाई... ह्या पत्राला उत्तर मिळणारचं नाहीये

Image may contain: 1 person, closeupपिंपरी,ता.३ मार्च २०१८९(अश्विनी सातव-डोके) : जेष्ठ समाजवादी नेते,माजी गृहराज्य मंत्री भाई वैद्य (वय वर्ष ९०) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले.भाई वैद्य यांच्यासोबत  अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, पञकार अश्विनी सातव डोके यांनी पञरुपाने श्रद्धांजली भाई वैद्य यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.वाचा सविस्तर हे पञ(जसे आहे तसे).

आदरणीय साथी भाई,
सप्रेम जयभारत,

ह्या दोन वाक्यांनी सुरवात करत तुम्हाला आज वर अनेक पत्र लिहिली. त्या प्रत्येक पत्राला उत्तर मिळालं. अनेकदा पत्रातल्या मुद्दयावर समक्ष चर्चा करुन उत्तर दिलीत. सगळ्या शंका दूर केल्या. नवे मुद्दे उपस्थित करत त्यावर विचार करायला लावला. आजवर कोणताही प्रश्न तुम्ही अनुत्तरीत ठेवला नाही. पण आजच्या ह्या पत्राला उत्तर मिळणारचं नाहीये. याच दुःख शब्दात मांडता येत नाहीये. नेहमीच्या सहजतेनं तुम्ही अनंताच्या प्रवासाला निघून गेलात. आज तुमच्या घरी आले तेव्हा ना तुम्ही दरवाजा उघडला, ना निघताना सावकाश जा म्हणत दरवाज्यापर्यत सोडायला आलात.

२९ तारखेला संध्याकाळी तुम्ही सिरीयस असल्याचा फोन आला. अवघे काही तासच राहिलेत, असं तुमच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. हे स्विकारता येत नव्हतं. कारण नुकतेच आठवड्याभरापूर्वी आपण फोनवर बोललो होतो. असं कसं होऊ शकतं हा विचार करेपर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे पटापट आवराआवर करत अनंताचा प्रवास सुरुही केला. आता आमच्या सोबत आहेत तुमच्या असंख्य आठवणी. ह्या आठवणींनी पिंगा घातलाय.

माझ्या जन्माच्या आधीपासूनची तुमची सोबत. तुमच्या सोबत कुठं दौऱ्यावर असलं की, खास शैलीत ओळख करुन द्यायचा, ही अश्विनी. कधी पासुन सेवादलात आहे, माहितीये का? आईच्या पोटात असल्यापासून ही सेवादलात आहे. हे वाक्य बोलताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव, आवाजातले चढउतार सगळं सगळं डोळ्यासमोर उभं राहतयं. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मुलांची तुम्ही ह्या खास शैलीत ओळख करून घ्यायचा.

जागतिकीकरणाच्या सोबत वाढणाऱ्या आमच्या पिढीला 'खाउजा' हा शब्द माहिती करुन दिलात तो तुम्ही. या 'खाउजा' धोरणाचे तोटे सांगत तुम्ही समाजवादाचं महत्व, गरज आम्हाला पटवून द्यायचा. त्यावर भाई, असं काही नसतं 'खाउजा' धोरणामुळं नोकऱ्या येतील अनेक संधी मिळतील असं म्हणत, तुमच्यात अन आमच्यात 'जनरेशन गॅप' आहे. अस उलट बोलून अनेकदा तुमच्याशी वाद घातला. एका अभ्यास शिबिरात तर टोकाला जाईल इतका वाद घातला. तरी तुम्ही चिडला नाहीत. नंतर पुन्हा शांतपणे मला समजावून सांगितलं. ह्या 'खाउजा' धोरणाच्या तुमच्या मतांवर शेवट पर्यत तुम्ही ठाम राहिलात. अनेक समाजवाद्यांची यावर गडबड झाली, पण तुम्ही मात्र ठामपणे आपला मुद्दा समजावत राहिला.

तुमच्या सोबत खुप प्रवास करायला मिळाला. तुमच्यासोबतचा प्रवास म्हणजे मुक्त विद्यापीठात मुक्तपणे वावरणं. काय काय शिकायला मिळायचं. तुमचं अख्ख आयुष्य साधेपणात गेलं. साधेपणा म्हणजे काय हे तुमच्या सोबत राहून समजलं. त्यातल्या काही गोष्टी आत्मसात केल्या. पण तुमच्या इतकं साधं रहाणं नाही जमणार. मंत्री असताना, महापौर असताना चाळीत रहाणारे, सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणारे तुम्ही. कसलाच डामडौल नाही. नाहीतर आताचे वार्ड अध्यक्ष पंतप्रधान असल्याच्या थाटात वावरत असतात. आज घरात सुद्धा अनेकदा बाटली बंद पाणी प्यायला वापरतो. पण तुमच्या सोबतचा रेल्वे प्रवास असो की एसटीचा जिथं गाडी थांबेल तिथलं पाणी भरून घ्यायचं, हा तुमचा शिरस्ता. त्यावर सगळ्या गावचं पाणी पचवायची ताकद पाहिजे....हा ढोस...कित्येक कार्यक्रमांना तर माझ्या स्कुटीवरुन तुम्हाला घेऊन गेले. कोणत्याही कार्यकर्त्याने तुम्हाला फोन करावा, कार्यक्रमाला बोलवावं. तुम्ही लगेच हो म्हणत त्या कार्यक्रमाला हजर रहाणं. तेही रिक्षा, टू-व्हीलर ज्याने शक्य असेल त्या वाहनाने. मग तो कार्यक्रम जाहीर असो वा कौटुंबिक. तुम्ही दिलेल्या वेळेत हजर.

भाई, तुमच्या सोबत असण्याचं कधी दडपण वाटलं नाही. इतका तो तुमचा सहज वावर. एक प्रचंड मोठं व्यक्तित्व सोबत असताना त्याच प्रेशर कधीच तुम्ही कार्यकर्त्यांवर येऊ दिल नाही. अगदी सहजपणे मिसळून जायचात. कोणती गोष्ट हवी आहे, अन ती तुमच्याकडून मिळाली नाही, अस कधी झालं नाही.

सेवादलाचे अध्यक्ष म्हणून काम करताना तुम्हाला पाहिलं. पायाला भिंगरी लावावी, तसं उभा देश तुम्ही पिंजून काढला. हिरक महोत्सवासाठी रात्रंदिवस झटून काम करताना तुम्हाला पाहिलं. नायगावच्या युवती मेळावाच्या वेळी अगदी बिनधास्तपणे आमच्या खांद्यांवर जबाबदारी देत, तो मेळावा यशस्वी करण्यासाठी धडपडताना तुम्हाला पाहिलं. वर्ड सोशल फोरमच्या वेळेस जगभरच्या समाजवाद्यांशी बोलताना तुम्हाला पाहिलं.

एसेमबद्दल तुम्हाला असणारा आदर तुम्ही कायम कृतीतून व्यक्त करत आलात. अगदी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कणाकणाने झिजलात. अश्या फार कमी गोष्टी असतील ज्या तुम्हाला न विचारता केल्या. पण नंतर त्या गोष्टी तुम्हाला कळल्यावर, मला कुठं काय विचारलं होत? अस न म्हणता, तुम्ही त्या गोष्टीत सोबत राहिला. त्यातली तुम्हाला अजिबात न आवडलेली गोष्ट म्हणजे कॉम्रेड पानसरे गेल्यावर आम्ही केलेलं बेमुदत उपोषण! आम्ही उपोषणाला बसलोय, हे सांगितल्यावर तुम्हाला उपोषण कस करतात हे माहितीये का ? तुझी तब्बेत धड आहे का? अस म्हणत आमच्या काळजीपोटी चिडलात. अन भर उन्हात आमच्यासोबत येऊन बसला. नंतर पुढचे सहा दिवस सतत आमची काळजी घेणं. तब्बेती खालावत जायला लागल्यावर, आम्हाला रागावणं ते उपोषण सोडताना आम्हाला ताकद देणं. प्रत्येक वेळी सोबत होता तुम्ही.

भाईंचं आता वय झालं, असं म्हणणारे जरी आम्ही असलो तरी आमच्या कोणत्याही कार्यक्रमात सगळ्यात आधी तुम्हीच आम्हाला हवे असायचा. ही गंमत होती. भाई, आपल्यात जनरेशन गॅप आहे, असं कितीही आम्ही म्हणालो तरी तुमच्याशिवाय आमची कोणती गोष्ट होत नव्हती. अगदी काही महिन्यांपूर्वी फुले वाड्यात केलेल्या 'शेतकऱ्यांच्या आसूड'च वाचन करताना सुद्धा आम्हाला तुम्ही हवे होता. अन नेहमीप्रमाणे एका फोनवर तुम्ही आलात.

माणगावचं शेतकऱ्यांचं आंदोलन, सेझ विरोधातला लढा, लवासा, गुजरातचा भुकंप, किती किती आंदोलन ज्यात तुम्ही पुढे होता..लढणाऱ्यांना बळ देत होता. 'पँथर ते नक्षल एक व्हा,' ही घोषणा देत एकत्र येण्याची आवश्यकता तुम्ही सतत पटवून देत होता. त्यासाठी न थकता प्रयत्न करत होता.

आणीबाणीच्या तुमच्या आठवणी, पुण्याचे महापौर असताना त्यावेळी इंदिरा गांधींची गाडी अडवण्याचा केलेला प्रयत्न, शनिवार वाड्यावर घेतलेली महागाईच्या विरोधातली सभा, आणि नंतर एकोणीस महिने काढलेला तुरुंगवास. हे सगळं तुमच्या तोंडून ऐकलं. १९४२ च्या लढ्यातला तुमच्या आठवणींबद्दल तुम्ही भरभरून सांगायचा. गोवा मुक्ती संग्रामात खाल्लेला मार, त्यामुळं खुप कमी वयात दोन्ही गुडघ्यांची करावी लागलेली ऑपरेशन्स. आणि त्याही परिस्थितीत भारतभर फिरणारे तुम्ही. चंद्रशेखर सोबत भारत यात्रेत असलेला तुमचा सहभाग. तुमच्या सोबत असलं की प्रश्न पडायचा हे थकत कसे नाहीत. अखंड कामात बुडवून घेतलं होतं.

अगदी शेवटी समाजवादी अध्यापक सभेच्या उभारणीसाठी तुम्ही झटला. अध्यापक सभा उभी केली. केजी टू पीजी मोफत शिक्षणासाठी तुमचा लढा सुरु होता. न थकता अखंडपणे चालत राहिला. प्रत्येकाला सोबत घेऊन तुमचं चालणं होतं.

जून मध्ये ९० व्या वर्षात तुम्ही एन्ट्री केली. शरद पवारांच्या उपस्थित दणक्यात वाढदिवस साजरा केला. त्यादिवशी सगळ्यात दमदार आवाज होता तो तुमचा. तुम्ही भाषणाला उभे राहुन बोलायला सुरुवात केली, तो तुमचा आवाज ऐकून सगळ्यानी टाळ्यांचा कडकडाट केला. तुम्ही शतक ठोकणार हा विश्वास होता.

वाढदिवस झाल्यावर, खुप दिवस घरी आलो नाही म्हणत तुम्ही घरी आलात. स्वतःहुन मला फोन केला. घरी येतोय. आजी, नानीसोबत त्यादिवशी पुन्हा जुन्या आठवणीत रमला होता. त्या दोघींना म्हणालात, परत निवांत येतो. नंतर लगेचच अँजिओप्लास्टी झाली, त्यातूनही ठणठणीत बरे झाला होता. आजाराला कायम तुम्ही चकवा देत होता, पण ह्यावेळी ते काही जमलं नाही.

आता तुम्हाला भेटून बाहेर पडताना, तुम्ही तुमच्या त्या मऊ लुसलुशीत हातात माझा हात घेतला नाही. त्या हातांच्या स्पर्शाची ऊब किती तरी वेळ सोबत असायची. दरवाजा पर्यत सोडताना हातात घट्ट हात धरायचात. अच्छा सावकाश जा म्हणत निरोप द्यायचात. पण आज हे काहीच घडलं नाही. तरी तो तुमच्या मऊ लुसलुशीत हातांचा ऊबदार स्पर्श आठवतोय.

समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी तुमचे प्रयत्न होते. पुढच्या काळात तुमच्या आठवणींसह आम्ही लढत राहू.
आठवणी असंख्य आहेत... त्यांची सोबत राहील...
झिंदाबाद भाई...

अश्विनी सातव-डोके
(पञकार,लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या,पिंपरी चिंचवड)

भाई वैद्य यांचे विचार कायम स्मरणात राहतील- गणेश थोपटे
जेष्ठ समाजवादी नेते,माजी गृहराज्य मंत्री, समाजवादी पार्टी (इं) चे संस्थापक - राष्ट्रीय प्रमुख भाई वैद्य (वय वर्ष ९०) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने पुण्यात दुःखद निधन झाले.

भाईनी पुण्याचे नगरसेवक, महापौर ते महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री असा राजकीय प्रवास करीत असताना आपला समाजवादी विचार कधीच सोडला नाही. त्यांनी कधीच जाती-पातीला थारा न देता, अखंड आयुष्यभर एका सरळ रेषेत चालून गोरगरिबांना, वंचितांना आणि कष्टकऱ्यांना आधार दिला. आयुष्यात भाईनी अनेक संकटे पाहिले आणि त्याच्याशी चार हात कसे करायचे याची प्रेरणा म्हणजे भाई. तरुणालाही लाजवेल असे काम भाई आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत निस्वार्थीपणे जनसामान्यांसाठी, तळागळातील जनतेसाठी करीत राहिले तसेच भाईनी संपूर्ण जीवनात आपल्या तत्वांशी आणि समाजवादी विचारांशी कधीही तडजोड केली नाही त्यामुळे भाईना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात मानणारा एक वर्ग आज खरच पोरका झाला. त्यांनी जनमाणसांसाठी आणि त्याच्या हक्कासाठी मोर्चे, सत्याग्रह, धरणे तसेच विविध सामाजिक प्रश्‍नांना आंदोलनाव्दारे वाचा फोडली. त्यांची वैचारिक बुद्धिमत्ता, अभ्यासू वृत्ती आणि जीवनातील संघर्ष हा भाईच्या रूपाने कायम स्मरणात राहील. परंतु भाईच्या जाण्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रात तयार झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. असा साधा, सरळ, सज्जन माणूस होणे नाही.

भाई वैद्य यांच्याविषयी थोडंसं...
जेष्ठ समाजवादी विचारवंत मा.भाई वैद्य (भालचंद्र सदाशिव वैद्य)यांची माहिती
जन्म – २२ जून १९२७
पत्ता - ए १०१, मारव्हेल ऐरीस, कांचन गल्ली (वाडेश्वर लेन), लॉं कॉलेज रोड, पुणे ४११००४
सध्या खालील पदावर कार्यरत होते
अध्यक्ष, एस.एम.जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे. (१९९८पासून)
अध्यक्ष, पुणे म.न.पा.सेवा निवृत्त संघ. (१९९५ पासून)
पुर्वी कार्य केलेली पदे.
राष्ट्रीय अध्यक्ष, सोशलिस्ट पार्टी (इंडिया) ( मे २०११ ते २०१६.)
राष्ट्रीय अध्यक्ष, भारत यात्रा ट्रस्ट, दिल्ली. (२००४ ते २०११)
राष्ट्रीय महामंत्री, जनता पार्टी. (१९८६ ते १९८८ )
राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषद. (१९९५ ते १९९९)
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल. (२००० ते २००२)
महापौर, पुणे (१९७४ ते १९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया मेयर्स कोंन्फरन्स (१९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा.(२००४ ते २०१३)
अध्यक्ष, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स यूनियन,पुणे. २०१३ पर्यन्त.
महाराष्ट्र राज्याचे गृह आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री. (१९७८ ते १९८०)
या कार्यकाळात पहिले मराठवाडा नामांतर विधेयक विधानसभेत मांडले.
स्मगलरचे सात साथीदार तीन लाख रुपये लाच घेऊन आले असताना गृहराज्य मंत्री म्हणून त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले.
महाराष्ट्र राज्य पोलिसांना फूल पॅंट देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
महाराष्ट्र सेवा निवृतांच्या वेतनामध्ये किमान निवृती वेतन आणि त्याची महागाईशी जोडणी या गोष्टी करून घेतल्या.

अनेक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग व तुरुंगवास

१९४२ साली शालेय जीवनात चलेजाव चळवळीमध्ये सहभाग.
१९५५ मध्ये गोवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये दुसर्‍या तुकडीत सहभाग आणि जबर मारहाण.
१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग व तुरुंगवास.
१९६१ साली कच्छ सत्याग्रहामध्ये भुज ते खावडा पदयात्रेत सहभाग.
१९७४ ते १९७७ या दरम्यान आणीबाणीमध्ये मिसाबंदी म्हणून १९ महीने तुरुंगवास.
१९८३ मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रा मध्ये ४००० किलोमीटर अंतराच्या यात्रेत सक्रिय सहभाग.
आत्ता पर्यन्त सुमारे २५ वेळा सत्याग्रह व तुरुंगवास. शेवटचा सत्याग्रह व अटक डिसेंबर २०१६ मध्ये ८८व्या वर्षी शिक्षण हक्कासाठी.
१९४३ साली राष्ट्र सेवा दलात सामिल झाल्यापासून ‘लोकशाही समाजवादी’ विचारधारा स्विकारली आणि आजतागायत ती निष्ठेने जपली.
१९४६ साली कोंग्रेस सोशलिस्ट पार्टी या जयप्रकाश नारायण, डॉ.लोहिया व एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रथम सदस्यत्व. त्यानंतर समाजवादी पक्षाची जी जी रूपांतरे झाली त्यात सक्रिय सहभाग.
विचारधारे संबंधी आयुष्यभर लेखन, प्रबोधन, संघर्ष व संघटन. एका समाजवाद्याचे चिंतन, मंडल आयोग व अन्य मागासवर्ग, समाजवाद, संपूर्ण शिक्षण: फी विना समान व गुणवत्तापूर्ण :का व कसे, आर्थिक आक्रमणाचे आरिष्ट (भाषांतरीत), परिवर्तनाचे साथी व सारथी, शब्दामागचे शब्द आदी पुस्तके प्रकाशित.
आजवर प्रतिष्ठेचे २५ पुरस्कार प्राप्त. : राजर्षि शाहू जीवन गौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार व इतर.
मूळगाव – दापोडे, ता.वेल्हा जि.पुणे
परिवार - मुलगा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व राष्ट्र सेवा दलाचे पुर्व कार्यकारी विश्वस्त डॉ.अभिजीत वैद्य, सुन डॉ.प्रा.गीतांजली वैद्य, मुलगी प्रा. प्राची रावल, जावई प्रताप रावल, नातवंड सोहिल, डॉ.सलिना व प्रशिलाComment Box is loading comments...

संबंधित बातम्या